मुंबई : गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या सर्व नियमित गाड्या रिग्रेट झाल्याने रेल्वेने घोषणा केलेल्या २०२ गणपती स्पेशल गाड्यांमुळे चाकरमान्यांना काहीसा दिलासा मिळाला. परंतु रविवारी २१ जुलैपासून या गाड्यांचे सकाळी ८ वाजल्यानंतर आरक्षण सुरू होताच एका मिनिटात त्या फुल्ल झाल्या. तिकीट काढण्याचा प्रयत्न करीत असलेल्या चाकरमान्यांना गाड्या रिग्रेट झाल्याचा संदेश आल्याने चाकरमानी हवालादिल झाले. त्यामुळे तिकीट आरक्षणात गैरप्रकार होत असल्याचा संशय प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे.
यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून त्यानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची रेल्वेच्या तिकिटासाठी धडपड सुरू आहे. ३ ते ७ सप्टेंबर दरम्यानच्या कोकणात जाणाऱ्या सर्व नियमित गाड्या रिग्रेट झालेल्या आहेत. त्यामुळे चाकरमान्यांच्या सोयीसाठी गणेशोत्सवानिमित्त मध्य आणि कोकण रेल्वेवरून २०२ गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य, कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तशी घोषणा करून रविवारपासून या गाड्यांचे आरक्षण सुरू झाले.
जादा गाड्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जायला मिळणार या आनंदात चाकरमान्यांनी सकाळी ८ वाजता आरक्षण सुरू होताच या गाड्यांचे बुकिंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अवघ्या एका मिनिटात या गाड्या फुल्ल झाल्याचे निदर्शनास आले. मागच्या पुढच्या तारखेची तिकिटे काढताना 'रिग्रेट' असा संदेश झळकत होता. त्यामुळे तिकीट आरक्षणात गैरप्रकार होत असल्याचा संशय प्रवाशांनी व्यक्त केला आहे.
रविवारी सकाळी आठ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास मी ०११५१ सीएसएमटी-सावंतवाडी स्पेशल ट्रेनचे ५ सप्टेंबरचे ठाणे ते कणकवली दरम्यानचे तिकीट काढण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडी रिग्रेट झाल्याचा संदेश आल्याची माहिती डोंबिवलीचे रहिवासी बळीराम राणे यांनी दिली.