गुडाळ : राधानगरी धरणातून होणाऱ्या साडे अकरा हजार क्यूसेक विसर्गा बरोबरच दिवसभर अतिवृष्टीमुळे ओढे- नालेही भरून वाहत असल्याने मंगळवारी सायंकाळी गुडाळ आणि गुडाळवाडी येथील 24 घरात भोगावती नदीच्या महापुराचे पाणी शिरले आहे.
दरम्यान, पूरग्रस्त नागरिकांनी गाई - म्हशी, धान्य आणि प्रापंचिक साहित्य प्राथमिक शाळा आणि नातेवाईकांच्या घरी हलवले आहे. 2019 साली या परिसरात आलेल्या प्रचंड महापुरात गुडाळ आणि गुडाळवाडी येथील बहुतांश घरात पाणी शिरले होते. यावेळीही तशी परिस्थिती दिसत असल्याने त्या महापुराच्या भयंकर आठवणीने ग्रामस्थांनी संभाव्य महापुराची धास्ती घेतली आहे.
मंगळवारी सायंकाळी सात पर्यंत गुडाळवाडी येथील श्रीपतराव हुजरे, चंद्रकांत भोई, सदाशिव भोई, संदीप हुजरे, सदाशिव मोहिते, शिवाजी मोहिते, कोंडीबा मोहिते, बाळासो वागरे, अभिजीत भोई, मारुती भोई, रामचंद्र हुजरे, राजेंद्र मोहिते, दत्तात्रय मोहिते यांच्या घरात महापुराचे पाणी आले आहे. पाण्याची पातळी वाढत असून आणखीही काही घरात पाणी येण्याची शक्यता आहे.
तर गुडाळ मधील शेवट गल्लीतील ॲड. संभाजीराव पाटील, आनंदा पाटील, मारुती पाटील, उत्तम पाटील, शिवा कृष्णा पाटील, बाबुराव रामचंद्र पाटील, बळवंत बापूसो पाटील, महादेव बाबुराव पाटील, शहाजी श्रीपती पाटील, डॉ.विक्रम पाटील, मधुकर पाटील यांच्या घरात पाणी शिरले आहे. पुराची तीव्रता वाढल्यास रात्री मध्ये आणखीही काही घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे.