

साळवण : गगनबावडा तालुक्यातील बोरेबेट येथील कल्पना आनंदा डुकरे (वय ३०) या सात महिन्याच्या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, मुसळधार पावसामुळे गगनबावडा-कोल्हापूर मार्ग बंद असल्याने १०२ रुग्णवाहिका खोकुर्ले येथे अडली. याच ठिकाणी रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसूती झाली. यात आई सुखरूप राहिली, परंतु दुर्दैवाने बाळाचा मृत्यू झाला. पुढील उपचारासाठी १०८ या रुग्ण वाहिकेतून डुकरे यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले.
ही घटना तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आणि पावसाळ्यात नागरिकांना भोगाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा अधोरेखित करणारी ठरली आहे. तालुक्यातील रुग्णालयांत तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, आवश्यक औषधसाठा, पायाभूत सुविधा व आधुनिक यंत्रणांची कमतरता असल्याने नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत. विशेषतः गर्भवती महिला, लहान मुले व वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू होताच गगनबावड्यात रुग्ण वाहतूक ठप्प होते व जीविताला धोका निर्माण होतो. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयांत अत्यावश्यक वैद्यकीय सेवा, तज्ज्ञ डॉक्टर व आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करणे तातडीचे आहे. अन्यथा अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडणाऱ्या प्रणालीवर तातडीने अंकुश ठेवून सक्षम आरोग्य यंत्रणा उभारणे ही काळाची गरज असल्याचे या घटनेतून स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे.