Kolhapur Flood News
सरूड, वडगाव, शिंपे या गावांना पुराचा वेढा पडला असून पूर्णपणे संपर्क तुटला आहे. Pudhari Network
कोल्हापूर

Kolhapur Flood : सरुड परिसराला कडवी-वारणा नदीच्या महापुराचा विळखा! संपर्क तुटला

पुढारी वृत्तसेवा

सरूड, पुढारी वृत्तसेवा : Kolhapur Flood : सरूड (ता. शाहूवाडी) परिसरात धुवांधार अतिवृष्टी सुरू आहे. सरूड, वडगाव, शिंपे या गावांना पुराचा वेढा पडला असून पूर्णपणे संपर्क तुटला आहे. गावा बाहेरच्या सर्व मार्गांवर कडवी आणि वारणा नद्यांच्या पुराचे पाणी आल्यामुळे परिसराला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

दूध संघांची वाहतूक यंत्रणा गावात पोहचू शकत नसल्याने हजारो लिटर दूध संकलन ठप्प झाले आहे. काही शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी संकलित केलेले दूध ट्रॅक्टर ट्रेलर मधून धाडसाने पुराच्या पाण्यातून दूध संघाच्या वाहतूक यंत्रणेला सोपविले. बहुतांश शेती क्षेत्र पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कडवी नदीला समांतर सौते ते शिरगाव मठ दरम्यान नव्याने झालेल्या भराव आणि मोरी पुलाचे पुराच्या पाण्याने मोठे नुकसान झाले आहे. (Kolhapur Flood News)

दरम्यान, परिसरात संततधार मोठ्या प्रमाणातील अतिवृष्टीच्या प्रभावामुळे सरूड (ता. शाहूवाडी) येथील दोन राहत्या घरांची मोठी पडझड झाली. यामध्ये ग्रामपंचायत नजीक सदाशिव बापूसो पाटील यांच्या मालकीच्या घराचे भिंतीसह छत कोसळले. तर बेघर वसाहतीतील श्रीमती कमळाबाई हरिभाऊ जाधव यांच्या राहत्या घराची भिंत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कोसळली. यामध्ये जाधव यांचे शेजारी महेश रमेश चव्हाण यांच्या घरावर ही भिंत पडल्यामुळे दोन्ही घरांचे आर्थिक नुकसान झाले. सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. संबंधित दोन्ही कुटुंबे भंगार व्यवसायावर उदरनिर्वाह चालवितात. स्थानिक सरपंच भगवान नांगरे, सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त कुटुंबियांना दिलासा दिला.

SCROLL FOR NEXT