

गारगोटी : पुढारी वृत्तसेवा
भुदरगड तालुक्यात सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे पुरस्थिती कायम आहे. जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून विजेच्या तारांवर, खांबावर पडल्यामुळे पश्चिम भुदरगड परिसर गेले पाच दिवस अंधारात आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या मोटर पंपांचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
तालुक्यात गेले आठ दिवस धुवाँधार पाऊस सुरू आहे. यामुळे वेदगंगा नदीला महापूर आल्यामुळे मडिलगे येथे गारगोटी कोल्हापूर रोडवर पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक गुरुवार सायंकाळी बंद झाली आहे. महालवाडी मार्गे कोल्हापूर वाहतूक सुरू आहे.
दरम्यान प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, तहसीलदार अर्चना पाटील, मंडल अधिकारी आर. के. टोळे, आर. एम. लांब, राहुल धाडणकर, सुरेश जंगले, उद्योजक सुदेश सापळे यांनी पुरस्थितीची पाहणी केली.
शेणगाव येथे पुराच्या पाण्याच्या धोका असलेल्या कुटूंबाना त्वरीत स्थलांतरित करण्याच्या सूचना प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांनी प्रत्यक्ष भेटीवेळी दिल्या.
नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. यामुळे पिके कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नळ पाणी पुरवठा करणाऱ्या मोटर पंपांना विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
महापूराचा धोका असलेल्या नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या सूचना प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, तहसीलदार अर्चना पाटील, उद्योजक सुदेश सापळे यांनी दिले.