Farmer Attempts Self-Immolation in Nimshirgaon
कोल्हापूर: निमशिरगांव येथे शेतकर्‍याने आत्मदहनाचा प्रयत्न केला.  Pudhari News Network
कोल्हापूर

कोल्हापूर: निमशिरगांव येथे भूमिहीन झाल्याने शेतकर्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

जयसिंगपूर: पुढारी वृत्तसेवा: निमशिरगांव (ता. शिरोळ) येथे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकार्‍यांना ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी मोजणीला विरोध करून अधिकार्‍यांना आज (दि.२४) धारेवर धरले. अशातच या अधिकार्‍यांसमोर येथील शेतकरी अविनाश कडोले यांनी माझी ३ एकर जमीन जाणार आहे. मी भूमिहीन होणार आहे. मला बाजारभावाच्या चारपट भरपाई द्या, अन्यथा हा महामार्ग रद्द करावा, अशी मागणी करत अंगावर रॉकेलचे कॅन ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली. अखेर जयसिंगपूर पोलिसांनी शेतकरी कडोले यांना ताब्यात घेतले.

Summary

  • शेतकरी अविनाश कडोले यांची ३ एकर जमीन बाधित

  • भूमिहीन होणार असल्याने बाजारभावाच्या चारपट भरपाईची मागणी

  • जमीन मोजणी अधिकार्‍यांसमोर आत्मदहनाचा प्रयत्न

निमशिरगांव येथे सोमवारी मोजणी करण्यासाठी प्राधिकरण अधिकारी व शिरोळ येथील भूमीअभिलेख कार्यालयाचे अधिकारी येणार असल्याचे समजल्यानंतर निमशिरगांवसह परिसरातील शेतकरी ग्रामपंचायतीसमोर एकत्रित झाले.

प्राधिकरण विभागाकडून पुन्हा मोजणीला सुरूवात

यावेळी राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील म्हणाले की, शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील बाधीत शेतकर्‍यांनी मोजणीला विरोध करून मोजण्या बंद पाडल्या आहेत. असे असताना प्राधिकरण विभाग मनमानी कारभाराने पुन्हा पुन्हा मोजणीला येऊन शेतकर्‍यांची चेष्ट करीत आहेत. यापुढे बाजारभावाच्या चौपट दर व उदगांव येथील बायपास महामार्गावरून मार्ग नेण्याचे निश्चित झाल्याशिवाय अधिकार्‍यांना पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा दिला.

यावेळी ग्रा.पं.सदस्य स्वस्तिक पाटील म्हणाले, निमशिरगांव येथे मोजणी होणार असल्याच्या नोटिसाही शेतकर्‍यांना देण्यात आल्या नाहीत. मग बेकायदेशीरपणे मोजणीला येता, जमिनी तुमच्या आहेत का? असा सवाल केला.

तलाठी सुनिल खामकर यांनी मोजणीला विरोध असल्याचा पंचनामा तयार केला.

त्यानंतर प्राधिकरणचे महेश पाटोळे यांना शेतकर्‍यांनी विरोध केल्यानंतर तलाठी सुनिल खामकर यांनी मोजणीला विरोध असल्याचा पंचनामा तयार केला. यावेळी सरपंच अश्विनी गुरव, उपसरपंच सुप्रिया सावंत, ग्रा.पं. सदस्य नंदकुमार कुंभार, सुमित पाटील, ईश्वर धनवडे, सागर पाटील, सुधाकर पाटील, सुदर्शन मगदूम, कुबेर पाटील, शितल पाटील, सुनिल पाटील, मजितखान हाकीम यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT