कोल्हापूर जिल्ह्यात मान्सून पुन्हा सक्रिय

कोल्हापूर जिल्ह्यात मान्सून पुन्हा सक्रिय

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गुरुवारी मान्सून पुन्हा सक्रिय झाला. शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत धुवाँधार पाऊस झाला. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात दिवसभर जोरदार पाऊस कोसळत होता. पावसाने तिलारी-भेडशी मार्गावरील पर्यायी रस्ता खचला. शाहूवाडी तालुक्यातील भाततळी परिसरात दरड कोसळली. कोदे धरण परिसरात अतिवृष्टी झाली. पावसाने बळीराजा सुखावला आहे.

जिल्ह्यात मान्सूनचे आगमन वेळेपूर्वीच झाले होते. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली होती. गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. आज जिल्ह्याच्या बहुतांशी भागात विशेषत: पश्चिमकेडील भागात सकाळपासूनच पावसाचा जोर होता. आजरा, चंदगड, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी आदी तालुक्यात पावसाचा जोर होता. दिवसभर पावसाची संततधार सुरू होती.

चंदगड तालुक्यात तिलारीनगर-दोडामार्ग मार्गावरील तिलारी ते भेडशीदरम्यान पुलाचे बांधकाम सुरू आहे. याकरीता पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. त्याच रस्त्यावरून वाहतूक सुरू असते. मात्र, आज परिसरात झालेल्या धुवाँधार पावसाने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने हा रस्ताच खचला. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली.

शाहूवाडी तालुक्यातील भाततळी परिसरातील घाटात दुपारी दरड कोसळली. मात्र, एका बाजूने रस्ता सुरू असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला नाही. शाहूवाडी तालुक्यातही दिवसभर पावसाने हजेरी लावली होती. राधानगरी तालुक्यातही अनेक भागाला पावसाने झोडपून काढले. राधानगरी गावातही रस्त्यावर पाणी साचले होते. आजरा परिसरात मुसळधार पाऊस झाला. दुपारनंतर गडहिंग्लज तालुक्यातही अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. भुदरगड तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. पाटगाव परिसरात तर पावसाची संततधार सुरू होती. यामुळे वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. पाटगाव-शिवडाव मार्गावर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा भराव खचला.

जिल्ह्याच्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस झाला. जोरदार पावसाने धरणात पाण्याची आवक सुरू होण्याची शक्यता आहे. मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने बळीराजा सुखावला आहे. दडी मारलेल्या पावसाने चिंतेत असलेल्या शेतकर्‍यांना या पावसाने दिलासा मिळाला आहे.

कोदे धरण क्षेत्रात अतिवृष्टी; सर्वाधिक 65 मि.मी. पाऊस

गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 2.3 मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात 17.4 मि.मी., पन्हाळ्यात 3.5, भुदरगडमध्ये 3.5 मि.मी. पाऊस झाला. गेल्या 24 तासांत कोदे धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. तिथे 65 मि.मी. पाऊस झाला. राधानगरी धरण क्षेत्रात 22 मि.मी., कासारी परिसरात 39 मि.मी., कुंभी परिसरात 17 मि.मी., पाटगाव परिसरात 28 मि.मी. पावसाची नोंद झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news