हुपरी; अमजद नदाफ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या विश्वकर्मा योजनेत चांदी कारागीर व धडी उत्पादकांचा समावेश करण्याची मागणी केली जात आहे. हस्त व्यवसायात मोडणाऱ्या चांदी व्यवसायातील या महत्वाच्या घटकांना या योजनेत समावेश केल्यास उद्योगातील आत्मनिर्भरता वाढीस लागेल. कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध झाल्यामुळे व्यवसायाला त्याचा चांगला फायदा मिळणा आहे.
गुरू-शिष्य परंपरेअंतर्गत कौशल्य कार्यात गुंतलेल्या कामगारांचा कौशल्य विकास केला जाईल, असे केंद्र शासनाचे धोरण आहे. मात्र हुपरीसह दहा गावांत घराघरात पसरलेल्या या व्यवसायात आजचा कामगार तो उद्याचा मालक हे ब्रीद वर्षानुवर्षे चालत आलेले आहे. संपूर्ण जगाची बाजारपेठ येथील उद्योगाने आपल्या कवेत घेतली आहे. मात्र या उद्योगातील कारागीर धडी उत्पादक व पूरक व्यवसायातील लोकांना सध्या चांगले दिवस नाहीत. या उद्योगात महिलासुद्धा मोठ्या प्रमाणत उतरल्या आहेत. सध्या उद्योगाने आधुनिक लूक निर्माण केला आहे. त्यामुळे चांदी कारागीर, धडी उत्पादक, पूरक व्यवसायिक यांच्यासह या उद्योगात विविध प्रकारचे कामे करणाऱ्या महिला कारागीरांचा समावेश केल्यास त्यांना थोडे का होईना भांडवल मिळेल आणि त्या जोरावर या व्यवसायात काही छोटी मोठी कामे ते करू शकतील.
विश्वकर्मा योजनेद्वारे एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. त्यावरील कमाल व्याज ५ टक्के असेल. एक लाखाच्या मदतीनंतर पुढील टप्प्यात २ लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध केले जाणार आहे. एक लाख रुपए उद्योगाच्या दृष्टीने तोकडी रक्कम असली तरी या उद्योगातील प्रघाता नुसार 'डाका' पुरती तर चांदी घेऊन कारागिर, धडी उत्पादक व अन्य पूरक व्यावसाईक आपला जम बसवतील. त्यामुळे केंद्र शासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
हेही वाचा :