कोल्हापूर

कोल्हापूर: दतवाड येथे ग्रा.पं. सदस्यासह पतीला मारहाण; जमावावर लाठीचार्ज

अविनाश सुतार

कुरुंदवाड: पुढारी वृत्तसेवा : दतवाड (ता.शिरोळ) येथील ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिल्याचा राग मनात धरून महिला सदस्याच्या पतीला काठीने मारहाण करून गुरूवारी (दि.३०) रात्री जखमी केले. तर भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिला सदस्याला धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याची फिर्याद सागर आण्णाप्पा कोळी (रा. दत्तवाड) यांनी कुरुंदवाड पोलिसांत दिली आहे.  याप्रकरणी नुर कासीम काले, साकीब काले, अकबर काले (तिघेही रा. दत्तवाड, ता. शिरोळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, रात्री साडे अकरा वाजता दत्तवाड ग्रामीण रुग्णालयासमोर हा प्रकार झाला त्यानंतर रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कुरुंदवाड पोलिसांत कोळी फिर्याद देण्यासाठी आला होता. संशयित आरोपी काले हा पोलीस ठाण्यासमोर आला असता कोळी समर्थकांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांना लाठीचार्ज करून जमाव पांगवावा लागला.

ग्रामपंचायत सदस्या राखी कोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला म्हणून याचा राग मनात धरून काले याने कोळी यांचे पती सागर कोळी यांना गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दत्तवाड ग्रामीण रुग्णालयासमोर अडवून शिवीगाळ करत मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या राखी कोळी यांनाही काले यांनी धक्काबुक्की केल्याचे व शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोघे पती-पत्नी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आले असता त्या ठिकाणी राखी कोळी यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. त्याचवेळी पोलीस ठाण्यासमोर नूरकाले हा आला असता नातेवाईक आणि समर्थकांनी संशयित आरोपी काले याला बेदम मारहाण केली. पोलीस ठाण्याच्या आवारातच हाणामारी सुरू असल्याच्या प्रकाराने पोलीस ही गोंधळून गेले.

जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या घटनेचे गांभीर्य ओळखून जयसिंगपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक रोहिणी सोळुंके यांनी धाव घेऊन काले आणि कोळी समर्थकांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. पहाटे उशिरा पर्यंत काले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर राखी कोळी यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT