मतमोजणीसाठी कोल्हापूर, सांगलीसह परिक्षेत्रात चोख बंदोबस्त

मतमोजणीसाठी कोल्हापूर, सांगलीसह परिक्षेत्रात चोख बंदोबस्त
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि. 4 ) होत आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह परिक्षेत्रात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पोलिस दलाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खबरदारीसाठी परिक्षेत्रातील पोलिस अधीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गुरुवारी सांगितले.

मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांना मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. या सूचनेचा परिक्षेत्रात काटेकोट अमल होईल, असेही त्यांनी निक्षून सांगितले. मतमोजणीनंतर हुल्लडबाजी करून दहशत माजविणार्‍या समाजकंटकांना तत्काळ ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेशही परिक्षेत्रांतर्गत पाचही पोलिस अधीक्षकांना देण्यात आल्याचे ते म्हणाले.

कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत सर्वच लोकसभा मतदारसंघामध्ये शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडल्याचे सांगून विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी म्हणाले की, निवडणूक काळात परिक्षेत्रात मोठ्याप्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये 7 संघटित टोळ्यांमधील 61 गुन्हेगारांवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आल्या आहेत.266 समाजकंटकांना तडीपार करण्यात आले. शिवाय काळेधंदेवाले, सराईत गुन्हेगार अशा 17 हजारांवर समाजकंटकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याचेही ते म्हणाले.

गुंडगिरी मोडून काढण्याचे निर्देश

कोल्हापूर, इचलकरंजीसह परिसरात गुंडागर्दी व खुनाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे सांगून फुलारी म्हणाले, गुंडगिरी मोडीत काढून त्यांच्यावर कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम गतीने राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात असा असेल बंदोबस्त

कोल्हापूर व हातकणंगलेची मतमोजणी मंगळवारी होत असल्याने जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत असल्याचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले. या दिवशी पहाटेपासून शहर, जिल्ह्यात 2 अप्पर पोलिस अधीक्षक, 7 पोलिस उपअधीक्षक, 26 पोलिस निरीक्षक,91 सहायक व उपनिरीक्षक,996 पोलिस अंमलदार, 1500 गृहरक्षक दलाचे जवान,2 प्लाटून सीआरपीएफ, 2 प्लाटून एसआरपीएफ असा फौजफाटा तैनात असणार आहे.

ड्रग्जप्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर होणार कठोर कारवाई

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ व कुपवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अलीकडच्या काळात कोट्यवधीचा ड्रग्ज साठा आढळून आला आहे. स्थानिक पोलिस यंत्रणांच्या अकार्यक्षमतेबाबत सांगली पोलिस अधीक्षकांमार्फत चौकशी प्रक्रिया सुरू आहे. अहवाल प्राप्त होताच दोषी अधिकारी, कर्मचार्‍यांवर निश्चित कठोर कारवाई केली जाईल. काळे धंदेवाल्याविरोधात कारवाईच्या सूचना असतानाही आदेशाचे उल्लंघन करणार्‍या प्रभारी अधिकार्‍यांवर कारवाईचेही विशेष पोलिस महानिरीक्षकांनी संकेत दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news