रुग्णांना मिळणारे प्रमुख फायदे...
पैशांची बचत : खासगी रुग्णालयात 10 ते 15 हजार रुपयांना होणारी चाचणी आता मोफत.
वेळेची बचत : रुग्णांची धावपळ थांबेल आणि एकाच छताखाली निदानाची व्यवस्था.
अचूक निदान : गंभीर आजार आणि अपघातांमध्ये त्वरित आणि अचूक निदान शक्य होईल.
एकनाथ नाईक
कोल्हापूर : अनेक वर्षांची प्रतीक्षा आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाला (सीपीआर) अखेर अत्याधुनिक एमआरआय तथा मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग या आधुनिक वैद्यकीय पद्धतीसाठीच्या उपकरणाचा आधार मिळाला आहे. तब्बल 70 कोटी रुपये किमतीचे, जगात सर्वोत्तम मानले जाणारे थ्री टेस्ला ल्युमिना मॉडेलचे एमआरआय उपकरण रुग्णालयात दाखल झाले असून येत्या पंधरा दिवसांत ते रुग्णसेवेत कार्यान्वित होईल.
या सुविधेमुळे अपघातग्रस्त, गंभीर आणि गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांतील महागड्या चाचण्यांपासून मुक्ती मिळणार आहे. यामुळे त्यांची पैशांची बचत तर होईलच; पण वेळेत निदान झाल्याने अनेकांचे प्राण वाचण्यासही मदत होणार आहे. या उपकरणाचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांसह सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सीमाभागामधील रुग्णांसाठी आधार ठरणार आहे.
सीपीआर रुग्णालयात दररोज बाह्यरुग्ण विभागात सुमारे 1700 ते 2000 रुग्ण येतात. यापैकी दररोज 40 ते 50 रुग्णांना अचूक निदानासाठी एमआरआय चाचणी करण्याची गरज असते. मात्र, रुग्णालयात ही सुविधा नसल्याने रुग्णांना खासगी निदान केंद्रांमध्ये (स्कॅनिंग सेंटर) पाठवावे लागत होते. तिथे त्यांना हजारो रुपये मोजावे लागतात. अनेकदा अपघातग्रस्त आणि गंभीर अवस्थेतील रुग्णांची यामुळे मोठी गैरसोय होत होती आणि उपचारास विलंब होत होता.
गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णालय प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून या उपकरणासाठी पाठपुरावा सुरू होता. मात्र, प्रशासकीय दिरंगाईमुळे ही फाईल केवळ चर्चेतच अडकून पडली होती. अखेर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या समस्येकडे वैयक्तिक लक्ष घालून प्रशासकीय मान्यतेसाठी सूचना दिल्या आणि 70 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यांच्या पुढाकारानेच ही खरेदीची प्रक्रिया वेगाने पूर्ण होऊन उपकरण सीपीआरमध्ये दाखल झाले आहे. अपघात विभागाच्या मागील बाजूस असलेल्या जुन्या ग्रंथालयाच्या इमारतीत हे उपकरण बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे.
येथील डॉक्टरांनी अत्याधुनिक उपकरणाचा आग्रह धरला होता, जेणेकरून रुग्णांना सर्वोत्तम सेवा मिळावी. आता ही मागणी पूर्ण झाल्याने वैद्यकीय वर्तुळातही समाधानाचे वातावरण आहे. ही एक आधुनिक वैद्यकीय तपासणी पद्धत आहे. याद्वारे शरीराच्या आतील अवयवांची, ऊतींची आणि इतर भागांची अत्यंत सुस्पष्ट आणि तपशीलवार चित्रे मिळवली जातात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तपासणीमध्ये एक्स-रे किंवा सीटी स्कॅनप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या हानिकारक किरणांचा वापर केला जात नाही. त्यामुळे ही एक अत्यंत सुरक्षित तपासणी मानली जाते.
सीपीआरमध्ये एमआरआय उपकरण दाखल झाल्याने रुग्णांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. याचा उपयोग केवळ गंभीर रुग्णांसाठीच नव्हे, तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही अभ्यासपूर्ण ठरेल. आता सर्व प्रमुख निदान आणि उपचार एकाच छताखाली उपलब्ध झाले आहेत. येत्या 15 दिवसांत हे उपकरण पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल.- डॉ.अजित लोकरे, अधिष्ठाता, सीपीआर रुग्णालय