

कोल्हापूर : इथेनॉल उत्पादनाकडे साखर कारखान्यांचा ओढा, काही राज्यांतील उसाबाबतची अनिश्चितता आणि काही कारखान्यांच्या गाळपास होणारा विलंब यामुळे साखरेचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय अन्न मंत्रालयाने चालू गळीत हंगामात 34 दशलक्ष टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविला आहे. हा अंदाज इंडिय शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने वर्तविलेल्या अंदाजापेक्षा कमी आहे. यामुळे सरकारदेखील साखर निर्यातीबाबत सावध भूमिका घेत आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार डिसेंबरनंतरच निर्यातीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या हंगामात इथेनॉलनिर्मितीमुळे देशाचे निव्वळ साखर उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे. देशांतर्गत साखर खप साधारणपणे 280 लाख टन असल्याने फक्त 20 लाख टन साखर जादा उरण्याचा अंदाज आहे. या साठ्याच्या आधारेच निर्यातीचा कोटा निश्चित केला जाणार आहे. काही राज्यांत ऊस उत्पादन आणि पुनर्प्राप्ती दरात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात उत्पादनाबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर साखरेचे दर सध्या स्थिर आहेत. गेल्या वर्षीच्या अनुभवावरून उत्पादन आणि उपलब्धतेबाबत तुटवड्याची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी सरकार निर्यातीवर तात्पुरती मर्यादा ठेवण्याचा विचार करीत आहे.