शिरोली पुलाची : शिये फाटा नजीकच्या टोप हद्दीतील फेडरल बँकेच्या शाखेनजीक पूर्व वैमानस्यातून गणेश शेलार यांने नितीन पाटील, विजय पोवार, सुशांत पोवार यांचेवर पिस्तुलातून दोघांवर गोळीबार केला. यामध्ये कोणालाही इजा झाली नाही. ही घटना सायंकाळी साडेसहा चे सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की आज सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान गणेश शेलार यांनी फेडरल बँकेतील आपल्या एटीएम मधून रक्कम काढली. त्यानंतर तो आपल्या चारचाकी गाडीतून बाहेर पडत असताना बँकेच्या दारातच अन्य दोन चारचाकी गाड्या आल्या. या गाड्यातून विजय पोवार, सुशांत पोवार यांच्यासह त्यांचे समर्थक आले. त्यांनी गाडीतून उतरून गणेशला मारहाण केली. त्यातून फेडरल बँकेच्या नजीकच्या गाळ्याकडे ही ढकला ढकली झाली. त्या रागातून गणेश शेलार यांने आपल्या पिस्तुलातून तीन वेळा गोळीबार केला.
दरम्यान हा वाद होण्यापूर्वी गणेश शेलार, नितीन पाटील यांच्यासह कृष्णा चौगुले आनंदा भोसले हे सर्वजण या घटनास्थळापासून शंभर मीटरवर असणाऱ्या गारवा हॉटेलमध्ये बसले होते. त्या ठिकाणी विजय पोवार, सुशांत पोवार हेही बसले होते. यावेळी गणेश शेलार व नितीन पाटील यांच्यात वाद सुरू झाला होता. त्यावेळी नजीकच्या टेबलवर बसलेल्या विजय पोवार यांनी त्याच्या जवळ जाऊन तुमचे मिटते का नाही ? अशी विचारणा केली. त्यातून तू आमच्यात काय भाग घेतलास म्हणून विजय पोवार यास विचारणा केली. त्यातून हा वाद वाढत गेला. त्यानंतर गणेश शेलार हा फेडरल बँकेत पैसे काढण्यासाठी गेला.
तो एटीएम मधून पैसे काढून बाहेर येत असतानाच हॉटेलमध्ये वाद झालेले विजय व सुशांत दोघे समर्थकासह तेथे आले. त्यावेळी गणेश शेलार यास विजय पोवार यांच्या समर्थकांनी धक्काबुक्की मारहाण केली .त्या ठिकाणी मारहाण केल्यावरून अखेर संतप्त शेलार याने बचावातून आपल्या पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे . त्यानंतर यातील संशयित गणेश शेलार, नितीन पाटील, विजय पोवार, सुशांत पाटील, कृष्णात चौगुले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. धीरज कुमार ,पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
यावेळी धीरज कुमार यांनी चौगुले यांनी चुकीची माहिती दिल्यावरून हा वाद होऊन त्याचे पर्यावसन नितीन पाटील व विजय पोवार यांचे वर गोळीबारात झाल्याचे सांगितले.त्या मुळे कोणीही विनाकारण गोळीबार सारखे पाऊल उचलून नये अन्यथा परवाना रद्द करून कारवाई करणार असल्याचे सांगितले. दरम्यान नऊ वाजता पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी शिरोली पोलीस ठाण्याला भेट दिली.