Kolhapur Crime: गणेशोत्सवामधील जुन्या वादातून बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी

बळवंतनगर कॉर्नरवरील घटना : तिघांना अटक
Kolhapur Crime |
Kolhapur Crime: गणेशोत्सवामधील जुन्या वादातून बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी Pudhari
Published on
Updated on

कोल्हापूर : गणेशोत्सव मंडळातील जुन्या वादातून भररस्त्यावर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी देणार्‍या पाचगाव (ता. करवीर) येथील पोलिस रेकॉर्डवरील रणजित राजेंद्र गवळी (वय 35) व त्याचा भाऊ चेतन राजेंद्र गवळी (32, रा. सहजीवन हौसिंग सोसायटी) व अरुण संभाजी मोरे (29, रा. कळंबा) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणने मंगळवारी अटक केली. बळवंतनगर कॉर्नरवर मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. संशयितांकडून गावठी बंदूक, मोटार हस्तगत करण्यात आली. गणेशोत्सवाच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. सकाळी या परिसरात तणाव निर्माण झाला होता.

बळवंतनगर येथील ऋषिकेश बाळासाहेब भोसले (रा. इंदिरानगर घरकूल) यांनी संशयितांविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बळवंतनगर मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. यापूर्वी ऋषिकेश भोसले व रणजित गवळी यांच्यात वादावादी झाली होती. या घटनेनंतर रणजितसह त्याचा भाऊ सक्रिय नव्हता. मंगळवारी मध्यरात्री दीडवाजेपर्यंत मंडळाच्या गणराय आगमनाची मिरवणूक सुरू होती. त्यात ऋषिकेश नियोजनात पुढे पुढे होता.

बंदूक रोखल्याने कॉर्नरवर तारांबळ

मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर रणजित, त्याचा भाऊ चेतन आणि साथीदार अरुण मोरे मोटारीतून बळवंतनगर कॉर्नर येथे आले. तिघांनी ऋषिकेशला शिवीगाळ सुरू केली. मंडळात पुढे, पुढे करतोस, आम्हाला विचारल्याशिवाय येथे पाय ठेवायचा नाही, अन्यथा तुला बघून घेईन, अशी धमकी दिली. त्यावर वादावादी होताच रणजितने मोटारीत ठेवलेली सिंगल बोअरची बंदूक काढली आणि ऋषिकेश यांच्यावर रोखली. या प्रकारामुळे चौकातील सार्‍यांची तारांबळ उडाली.

बंदूक, मोटार ताब्यात

काही तरुणांनी रणजितकडून बंदूक काढून घेतल्यानंतर तणाव निवळला. ऋषिकेश भोसले यांनी मध्यरात्री करवीर पोलिस ठाणे गाठले. रणजितसह तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक श्रीकांत शिंदे, निरीक्षक रवींद्र कळमकर घटनास्थळी दाखल झाले. संशयितांसह बंदूक, मोटार ताब्यात घेण्यात आली. संशयित रणजित याच्यावर यापूर्वी जुना राजवाडा आणि करवीर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news