

कोल्हापूर :
जागतिक व प्रादेशिक हवामानाच्या स्थितीत सतत बदल होत असल्याने पावसाचा लहरीपणा वाढला आहे. भारतीय महासागरातील निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोल आणि पॅसिफिक महासागरातील ‘ला निना’ या दोन प्रमुख हवामान बदलांचा दुहेरी परिणाम पावसावर होत आहे. परिणामी, पाऊस ऑक्टोबरपर्यंत कोल्हापूरसह राज्यात मुक्कामी असण्याची दाट शक्यता आहे. हवामान स्थिती अशीच राहिल्यास मान्सूनचा परतीचा प्रवास उशिरा सुरू होईल व ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यापर्यंत पावसाची रिपरिप कायम राहील, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
सध्या ‘आयओडी’ सलग पाचव्या आठवड्यापासून निगेटिव्हमध्ये आहे व त्याचा इंडेक्स उणे 1.2 अंशापर्यंत खाली आला आहे. ही स्थिती 2022 नंतरची सर्वात कमी आहे. दरम्यान, पॅसिफिक महासागरात ‘ला निना’ विकसित होत असून, त्याचा परिणाम पुढील काही महिन्यांत जाणवेल. या दोन्ही घटनांचा एकत्रित परिणाम म्हणजे सप्टेंबरच्या अखेरीस आणि ऑक्टोबरमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
यामुळे वाढतो पावसाचा कालावधी
पॅसिफिक महासागरातील मध्य पूर्वेकडील भागात समुद्राचे पाणी थंडावते तेव्हा ‘ला निना’ स्थिती निर्माण होते. या स्थितीत भारतासह आशियात मान्सून सक्रिय राहतो. पावसाचा कालावधी वाढतो आणि परतीला उशीर लागतो.
जून ते आजअखेर झालेला पाऊस
सरासरी : 1,487.3 मि.मी.
झालेला पाऊस : 1,048.8 मि.मी.
टक्के : 70.5
निगेटिव्ह ‘आयओडी’ म्हणजे काय?
भारतीय महासागरातील पाण्याच्या तापमानातील तफावतीवरून ‘आयओडी’ ठरतो. पूर्वेकडील भाग (इंडोनेशियाजवळ) गरम आणि पश्चिमेकडील भाग (आफ्रिकाजवळ) थंड झाला की, त्याला निगेटिव्ह म्हणतात. यामुळे पर्जन्यमानाचे पट्टे पूर्वेकडे सरकतात आणि भारताच्या पश्चिम किनार्यावर (कोकण, कर्नाटक, केरळ), तसेच महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जास्त पाऊस पडतो.