कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : काळम्मावाडी थेट पाईपलाईनची मे नंतर चार महिन्यांनी चाचणी होणार असे अधिकारी एका बाजूने सांगतात तर मग पालकमंत्री मे महिन्यापर्यंत थेट पाईपलाईनचे पाणी देणार असे कोणत्या आधारावर म्हणत आहेत, असा प्रश्न उपस्थित करून थेट पाईपलाईन योजनेमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. त्याच्या चौकीशीसाठी समिती स्थापन करावी यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सत्यजित कदम यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. थेट पाईपलाईन योजनेच्या पाहणीनंतर ते बोलत होते.
निवडणूक आली की थेट पाणी योजनेबाबत खोटं सांगून पालकमंत्री लोकांची फसवणूक करतात, असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, पाणी उपसा केंद्रापर्यंत विजेचे खांब टाकण्याचे निम्मे काम बाकी आहे. पंपिंग हाऊसचे केवळ 50 टक्के काम झाले असून ते एक महिन्यात होणे शक्य नाही. पाईपलाईनचे कामही अपूर्णच आहे. त्यामुळे पुढील वर्षी तरी या योजनेतून पाणी मिळेल की नाही हे सांगणे अवघड आहे. पालकमंत्री मे महिनाअखेर काम पूर्ण होईल असे म्हणतात तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढच्या दिवाळीचा वायदा केल्याचे ते म्हणाले.
जॅकवेलचे काम पूर्ण होण्यापूर्वीच 15 कोटी रुपयांच्या एक हजार एच.पीच्या मोटरची सहा वर्षांपूर्वी घाईने खरेदी केली. 2017 पर्यंत या योजना पूर्ण होणार होती. ती 2022 च्या मध्यापर्यंत देखील पूर्ण होऊ शकत नाही. यामुळे योजनेची किंमत वाढली. जादा दराने काम दिल्यामुळे 69 कोटी रुपये ठेकेदाराला द्यावे लागणार आहेत.त्यासाठी महापालिकेकडे पैसे नाहीत. त्यामुळे सल्लागार कंपनीवर फौजदारी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
घाईगडबडीने निविदा काढून हे काम सुरू केले. 18 विभागांची परवानगी आवश्यक होती. त्यापैकी 11 विभागांची परवानगी भाजप सरकाने दिली. त्यामुळे भाजपने हा प्रकल्प अडविला हा त्यांचा आरोप खोटा आहे. या प्रकल्पाला केंद्राकडून मिळणारा निधी थांबविलेला नाही. या प्रकल्पामध्ये अनेक बाबी चुकीच्या केल्या आहेत. 30 किलो मिटर लांबून लाईट घेणे चुकीचेच आहे, असे अजित ठाणेकर म्हणालेे. सुनील कदम म्हणाले, कामाचा दर्जा पाहता या कामाची केंद्र सरकारने चौकशी करुन यातील दोषींवर कठोर कारवाई करावी. योजनेचा आराखडाच बदलल्याचा आरोपही त्यांनी केला.
योजनेसाठी मंजूर निधीपैकी सुमारे 80 ते 90 टक्के निधी खर्च झाला आहे. यावरून पालकमंत्र्यांनी थेट पाईपलाईनचे काम त्या प्रमाणात पूर्ण झाल्याचे सांगितले असावे. मात्र, कामाची पूर्तता ही खर्चाच्या टक्केवारीवरून ठरत नसते, हे पालकमंत्र्यांना माहीत नसावे, असेही कदम म्हणाले.
कोणत्याही कामाचा अगोदर पाया मग कळस असतो. मात्र, थेट पाईपलाईनच्या कामामध्ये पहिल्यांदा जॅकवेलचे काम पूर्ण करून नंतर पाईपलाईनचे काम करणे आवश्यक होेते. येथे मात्र अगोदरचे पाईपलाईनचे काम करून जॅकेवल अर्धवट स्थितीत असल्याचे विजय सूर्यवंशी म्हणाले.