कोल्हापूर

कोल्हापूर : सत्ताधारी गटाला धक्का! ‘बिद्री’ निवडणुकीसाठी ए.वाय.पाटील विरोधी गटाकडे?

मोहन कारंडे

बिद्री : टी.एम.सरदेसाई : बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत ए. वाय. कुणाचे? म्हणून अनेक महिने चर्चा सुरू होती. मंत्री हसन मुश्रीफ यांनी ए.वाय.यांची जबाबदारी माझ्यावर सोपवा, असा आत्मविश्वास सांगितला होता. पण कोल्हापूर येथे झालेल्या गुप्त बैठकीत माझ्यावर प्रत्येकवेळी अन्याय झाला आहे, माझ्या कार्यकर्त्यांचा ही विचार करावा लागेल, माझ्या मागणीवर मी ठाम असल्याचे ए.वाय यांनी सांगितले. त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांनी विचार करा असे सांगितले असले, तरी ए. वाय. पाटील यांचा विरोधी आघाडीकडे कल स्पष्ट असल्याचे दिसते. दोन दिवसात ते भूमिका स्पष्ट करणार असल्याचे समजते. मागील आठवड्यात 'दै. पुढारी'ने सत्तारूढ गटाला छेद जाणार असल्याची शक्यता वर्तविली होती.

बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीपूर्वीच अजित राष्ट्रवादी पवार गटाचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांच्यात कुरबूर सुरू होती. ए. वाय. यांनी स्वतंत्र मेळावे घेवून तोंडसुख घेत कार्यकर्त्यांत जागृती केली होती. काही कार्यकर्त्यांनी आपला एकत्र गट असून चांगले चाललेले घर फुटायला नको, असा सल्ला दिला होता. तर या सल्ल्याला काहींनी विरोध केला होता. त्यामुळे ए. वाय. गटाने निवडणुकीसाठी स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. काही उत्साही कार्यकर्त्यांनी 'केपीं'ना सोडाच, असा आग्रह धरत तिलारीत झालेल्या बैठकीत सांगितले होते. असे असले तरी तुम्ही जो निर्णय घ्याल, तो आम्हास मान्य असेल, आम्ही तुमच्याबरोबर आहे, असाही सूर ओढला होता.

के. पी. पाटील व ए. वाय. पाटील हे एकाच राधानगरी-भुदरगड विधान सभा मतदार संघात येतात. गत विधानसभा निवडणुकीसाठी ए. वाय. यांनी जोरदार मागणी केली होती. मात्र राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने माघार घेत केपींना पाठिंबा द्यावा लागला होता. त्यानंतर दोन वर्षात अंतर्गत कुरबुरी सुरु होत्या. आमदारकी किंवा 'बिद्री ' चे अध्यक्षपद या दोन मुद्द्यावर होते. यानंतर राधानगरीतील ६ जागा व अध्यक्षपद या मागणीवर ते ठाम राहिले. मंत्री मुश्रीफ हेही अनेक दिवस त्यांना समजावित होते. मेव्हणे-पाहुणे यांच्यातील आतापर्यंतचा अंतर्गत संघर्ष ताटा-वाटीतील होता. पण ऐन दिवाळीत मंगळवारी रात्री कोल्हापूर येथील सर्कीट हाऊसवर मुश्रीफ व सतेज पाटील यांच्या उपस्थितीत के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांची बैठक झाली. या बैठकीत ए. वाय. हे राधानगरीच्या सहा जागांवर व अध्यक्षपदावर ठाम राहिले. मंत्री मुश्रीफ यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. मला कार्यकर्त्यांचा सन्मान राखायला पाहिजे, म्हणून ए. वाय. पाटलांनी तेथून काढता पाय घेतला. येत्या दोन दिवसांत ते आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. ए. वाय. यांच्या भूमिकेमुळे सत्तारूढ गटाला छेद गेला आहे. विद्यमान दोन संचालक ए. वाय. बरोबर आहेत. यामुळे आमदार प्रकाश आबिटकर व खासदार संजय मंडलिक यांच्या आघाडीला बळ मिळण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत निवडणुकीच्या मोठ्या घडामोडी होण्याच्या शक्यता आहेत.

१७ नोव्हेंबरला 'बिद्री' च्या निवडणुकीची उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. या दोन दिवसात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. पॅनेल रचना ए व बी प्लॅन रचले जात आहेत. सत्तारूढ गटाचे मंत्री हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, दिनकरराव जाधव, प्रवीणसिंह पाटील, 'गोकुळ' चे संचालक आर. के. मोरे तसेच फुटीर जनता दल गट विरोधी गटात मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, शाहू ग्रुपचे समरजितसिंह घाटगे, माजी आमदार अमल महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, असा दुरंगी सामना होण्याची शक्यता आहे.

'त्यांच्या निर्णयांची वाट पहाणार'

मंत्री मुश्रीफ यांच्याबरोबर बैठक झाली. यापूर्वी ही त्यांची माझी भेट होत असते. मी कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करून माझी भूमिका त्यांच्यापुढे ठेवली आहे. माझ्या भूमिकेपेक्षा कार्यकर्त्यांचे मत महत्वाचे आहे. त्यांचा विचार वेगळा असेल तर माझा निर्णय तोच असेल. तरी ही मंत्री मुश्रीफ यांच्या निर्णयाची वाट पाहत आहे. असे ए. वाय. पाटील यांनी 'दै.पुढारी' सोबत बोलताना सांगितले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT