भोगावती कारखाना निवडणूक: तिन्ही पॅनेलच्या समर्थकांचा सोशल मीडियावर प्रचाराचा धुरळा | पुढारी

भोगावती कारखाना निवडणूक: तिन्ही पॅनेलच्या समर्थकांचा सोशल मीडियावर प्रचाराचा धुरळा

राशिवडे: पुढारी वृत्तसेवा : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने सोशल मीडियावर तिन्ही पॅनेलच्या समर्थकांनी वातावरण चांगलेच तापवले आहे. ‘एकच फाईट वातावरण टाईट’ असे वातावरण समर्थकांनी करून आपल्याच पॅनेलचा विजय होणार असा दावा सुरू केला आहे.

भोगावतीसाठी काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे ए. वाय. पाटील, शेकापचे माजी आमदार संपतराव पवार-पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, जनता दलाचे वसंतराव पाटील यांची राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडी, तर भाजपचे हंबीरराव पाटील, नामदेव काका पाटील, काँग्रेसचे सदाशिवराव चरापले, शिवसेनेचे अजित पाटील, शेकापचे बाबासो देवकर यांची शिवशाहू विकास परिवर्तन आघाडी, तर धैर्यशील पाटील कौलवकर यांची संस्थापक  कै. दादासाहेब पाटील कौलवकर आघाडी या तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत होत आहे.

राजकीय शक्तीप्रदर्शन, प्रचारसभा, पदयात्रांना जोर आला आहे. तर तिन्ही पॅनेलच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रचाराची राळ उठवून दिली आहे. गेल्या वीस, पंचवीस वर्षांच्या कारभाराचे वाभाडे काढले जात आहेत. दिवाळी सणामुळे थंडावलेला प्रचार वेगवान झाला आहे. आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तिन्ही पॅनेलचे समर्थक एकमेकांवर टीकटिप्पणी करू लागले आहेत.

हेही वाचा 

Back to top button