कसबा बावडा; पुढारी वृत्तसेवा : चित्रपटसृष्टीमध्ये फिल्मफेअर पुरस्कार हा अत्यंत मानाचा पुरस्कार मानला जातो. फिल्मफेअर पुरस्कार मिळणे हे प्रत्येक कलाकारासाठी स्वप्न असते. यातील मराठी फिल्मफेअर पुरस्काराचे वितरण गुरुवार (दि. ३१ मार्च) रोजी बांद्रा वेस्ट येथे करण्यात आले. या मानाच्या पुरस्कारावर करवीर नगरीतील कसबा बावड्याचा रहिवासी अभिनेता विराट मडके याने नाव कोरले आहे. चित्रपट सृष्टीत सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार अभिनेता विराट मडके याला मिळाला आहे.
या पुरस्काराबाबत दै 'पुढारी' शी बोलताना विराट म्हणाला, 'केसरी' या सिनेमासाठी मला (फिल्मफेअर २०२१) पदार्पणाचा पुरस्कार मिळाला आहे. मार्च २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि आठ दिवसातच कोरोनामुळे लॉकडाऊन लागला. या काळात ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांनी त्याचबरोबर, पुढील काळात ज्यांनी हा चित्रपट विविध माध्यमांद्वारे पाहिला त्यांनी या चित्रपटाबद्दल चांगले लिहिले आहे.
पहिल्या सिनेमासाठी फिल्मफेअर पुरस्काररुपी मिळालेली शाबासकीची थाप खूपच मोलाची आहे. पुरस्कार मिळाला त्यामुळे काहीसा स्तब्ध झालो विश्वासच बसेना. चार वर्ष या चित्रपटातील बलराम जाधव या पैलवानाची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी कष्ट घ्यावे लागले, या काळात महाराष्ट्रातील अनेक नामवंत पैलवानांशी संपर्क आला. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. महाराष्ट्र केसरी सारखी स्पर्धा जवळून पाहता आली. या चित्रपटासाठी आई-वडील, पत्नी आणि भावाची मोलाची साथ लाभल्याचे तो आवर्जून सांगतो.
शाहू विद्यालय येथे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले यानंतर विवेकानंद महाविद्यालयात अकरावी-बारावीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे एमआयटी पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना प्रायोगिक रंगभूमीवर पदार्पण केले. या माध्यमातून स्वतःला आणि महाविद्यालयाला वेगवेगळे पुरस्कार मिळाले येथूनच अभिनयाचा नवा प्रवास सुरू झाला.
यापूर्वी माझा 'सोयरीक' हा चित्रपट येऊन गेला आहे. 'बारदोषी' हा नवा चित्रपट येत आहे, दीपक राणे यांच्या एका चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. एका नव्या वेब सिरीज मध्ये काम करणार आहे.