Theft Pudhari
कोल्हापूर

बांबवड्यात चोरींचा सुळसुळाट ; पोलीस चौकी शेजारीच ज्वेलर्स दुकाने फोडली

Kolhapur theft news | नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे परिसरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे पोलीस चौकीच्या अगदी शेजारीच असलेल्या सराफ गल्लीतील तीन ज्वेलर्स दुकाने फोडून चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याने व्यापारी वर्गासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी व्हॅनमधून येत बांबवडे येथील सराफ गल्ली गाठली. येथे त्यांनी कटरच्या साहाय्याने तीन ज्वेलर्स दुकानांचे शटर उचकटून आत प्रवेश केला. या घटनेत सुमारे १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. सुदैवाने दुकानातील लॉकर अबाधित राहिल्याने मोठा आर्थिक अनर्थ टळला.

या चोरीतील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी दोन दुकानांतील सीसीटीव्ही डीव्हीआरही चोरून नेले, ज्यामुळे तपासात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये अंदाजे पाच चोरटे दिसून आले आहेत. त्यांनी पूर्ण चेहरा झाकलेला असल्याने त्यांची ओळख पटविणे कठीण झाले आहे.

घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याआधी घडलेल्या अनेक चोरीच्या घटनांचा अद्याप उलगडा न झाल्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी नाराजी वाढत आहे. बांबवडे एसटी स्टॅण्ड परिसर हा कायमच वर्दळीचा भाग असून, येथे अहोरात्र प्रवाशांची ये-जा सुरू असते. याच मध्यवर्ती ठिकाणी पोलीस चौकी असतानाही चोरट्यांनी एवढी धाडसी कारवाई केल्याने पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

गेल्या काही महिन्यांतील घटनांचा विचार करता, बांबवडे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक दिसून येत आहे. सहा महिन्यांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रमधून पैसे काढून आलेल्या एका ग्राहकाची १ लाख रुपयांची बॅग भरदिवसा लंपास करण्यात आली होती. तसेच, चार महिन्यांपूर्वी साळशी येथे देवाच्या कार्यक्रमादरम्यान सुमारे १० लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली होती. या दोन्ही घटनांचा अद्याप उलगडा झालेला नाही.

याशिवाय, आठवडी बाजाराच्या दिवशी दुचाकी चोरी, मोबाईल चोरी आणि भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अवैध व्यवसायही राजरोसपणे सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या सर्व घटनांमुळे पोलिसांचा धाक उरलेला नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. व्यापारी व नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवावी, सीसीटीव्ही यंत्रणा मजबूत करावी आणि चोरीच्या घटनांचा तातडीने उलगडा करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा, या वाढत्या गुन्हेगारीमुळे परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन असुरक्षित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT