Ratnagiri Theft : पावणेचार लाखांच्या दागिन्यांची चोरी

गुहागर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा झाला दाखल
Ratnagiri Theft
पावणेचार लाखांच्या दागिन्यांची चोरी
Published on
Updated on

गुहागर शहर : वरळी (मुंबई) येथून गुहागरकडे येत असताना एका महिलेच्या बॅगेतून तब्बल 3 लाख 84 हजार 800 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.प्रवासादरम्यान घडलेल्या या चोरीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून गुहागर पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मैथिली मिलिंद आरेकर (51, रा. वरळी, मुंबई) या आपला मुलगा ऋग्वेद याच्यासह 26 एप्रिल रोजी रात्री गुहागरला जाण्यासाठी निघाल्या होत्या. वरळी ते गुहागर या दीर्घ प्रवासादरम्यान 26 एप्रिल रोजी रात्री 9.15 वाजल्यापासून ते 27 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आरेकर यांच्याजवळील काळ्या रंगाच्या प्रवासी बॅगेमध्ये वामन हरी पेठे ज्वेलर्सचे जांभळ्या रंगाचे पाकीट ठेवले होते. या पाकिटात मौल्यवान सोन्याचे दागिने ठेवले होते. मात्र प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने संधी साधून बॅगेतून हे पाकीट चोरून नेले.

चोरीस गेलेल्या ऐवजात सुमारे 1 लाख 30 हजार रुपये किमतीचे पाच तोळ्यांचे व 38 इंच लांबीचे मोठे मंगळसूत्र, 2 लाख 52 हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी एक तोळ्याच्या चार सोन्याच्या बांगड्या, तसेच 2 हजार 800 रुपये किमतीचा जास्वंदीच्या फुलांची नक्षी असलेला कर्णफुलांचा जोड असा एकूण 3 लाख 84 हजार 800 रुपयांच्या ऐवजाचा समावेश आहे. गुहागर येथे पोहोचल्यानंतर बॅगेतील दागिने गायब झाल्याचे लक्षात येताच आरेकर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने गुहागर पोलिस ठाणे गाठून याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

ही चोरी नेमकी प्रवासाच्या कोणत्या टप्प्यात झाली, बसमध्ये, खासगी वाहनात की इतर कोणत्या ठिकाणी, याचा तपास पोलिस करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रवासातील थांबे, तसेच संशयितांची हालचाल यांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news