अंबाबाई किरणोत्सव 
कोल्हापूर

Kolhapur Ambabai Kironotsav |आजपासून अंबाबाई मंदिरात चाचणी, 'या' तारखेपासून किरणोत्सव सोहळा

९ ते ११ नोव्हेंबरदरम्यान किरणोत्सव सोहळा; सूर्यकिरणांची दिशा, कोन आणि संभाव्य अडथळ्यांची निरीक्षण प्रक्रिया पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिरात होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण किरणोत्सव सोहळा ९ ते ११ नोव्हेंबर या तीन दिवसांत होणार आहे. त्यापूर्वी शनिवारी, ७ नोव्हेंबरपासून किरणोत्सवाच्या चाचणीला सुरुवात करण्यात येणार आहे. सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची सोनेरी किरणे मंदिराच्या महाद्वारातून थेट देवीच्या मूर्तीपर्यंत पोहोचतात. या अद्भुत नैसर्गिक आणि वैज्ञानिक सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी भाविकांसह अभ्यासकांनाही उत्सुकता लागली आहे.

किरणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सूर्यकिरणांची दिशा, त्यांचा कोन, वातावरणातील परिस्थिती आणि किरणांच्या मार्गात येणारे संभाव्य अडथळे यांचे विशेष निरीक्षण करण्यात आले. मंदिर परिसरातील इमारती, झाडे किंवा अन्य भौतिक अडथळ्यांमुळे सूर्यकिरणांच्या मार्गात बदल होतो का, याचाही अभ्यास करण्यात आला. यासाठी विविध शास्त्रीय उपकरणांचा वापर करण्यात आला.

दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी आणि नोव्हेंबर महिन्यात सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन प्रवासादरम्यान अंबाबाई मंदिरात किरणोत्सव अनुभवायला मिळतो. सूर्यास्ताच्या वेळी मंदिराच्या स्थापत्यरचनेतून सूर्यकिरणांचा प्रवास होत देवीच्या मूर्तीवर पडतो. पहिल्या दिवशी देवीच्या चरणांवर, दुसऱ्या दिवशी मूर्तीच्या छातीपर्यंत, तर तिसऱ्या दिवशी संपूर्ण मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात. सूर्याच्या बदलत्या स्थानानुसार घडणारा हा विलक्षण सोहळा मंदिराच्या प्राचीन स्थापत्यकलेचे आणि खगोलशास्त्रीय दर्शन घडवतो.

किरणोत्सव ही केवळ धार्मिक श्रद्धेशी जोडलेली घटना नसून मंदिराच्या स्थापत्यरचनेचा आणि सूर्याच्या बदलत्या स्थितीचा अभ्यास करण्याची एक महत्त्वपूर्ण संधी आहे.

- डॉ. मिलिंद कारंजकर, खगोलशास्त्र अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT