रुकडी ः भरधाव इनोव्हा कारने छोटा हत्ती टेम्पोला पाठीमागून जोराची धडक दिल्याने इनोवा कार तीन वेळा पलटी झाली. या अपघातात कारमधील 22 वर्षीय विद्यार्थिनी दिव्या कानिफनाथ भोसले (सध्या राहणार राजारामपुरी कोल्हापूर मूळ राहणार नानज सोलापूर) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर देविका भुते ही गंभीर जखमी असून तिच्यावर कोल्हापुरात खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात आज सकाळी नऊ वाजता कोल्हापूर सांगली रोडवर माले ता : हातकणंगले फाट्यावर घडला.
अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठांमध्ये मयत दिव्या कानिफनाथ भोसले आणि जखमी विद्यार्थिनी देविका भुते या एमसीए प्रथम वर्षात शिकत होत्या. त्या राजारामपुरीत राहत होत्या. आज विद्यापीठात परीक्षा असल्याने या दोन विद्यार्थिनी आणि दोन विद्यार्थी असे चौघेजण MH10 DW 0700 या भाड्याने घेतलेल्या इनोव्हा कार मधून सकाळी ८:३० च्या दरम्यान कोल्हापूर मधून बाहेर पडले. परीक्षा आटोपून देविका भुते हिच्या वाढदिवसासाठी बाहेर जाणार होते. इनोव्हा कारचालक ईशान धुमाळ याने कार सुसाट वेगाने चालवत घोडावत विद्यापीठ कडे निघाला होता. कोल्हापूर सांगली मार्गावरील हातकणंगले तालुक्यातील माले फाट्यावर
याच वेळी MH 09EM 6290 हा छोटा हत्ती स्क्रॅपच्या प्लॅस्टिक आणि काचेच्या बाटल्या भरून माले फाट्यावर पुलाशेजारी थांबला होता. त्याचा चालक विशाल गोसावी हा ओढ्यामध्ये बाटल्या गोळा करण्यास गेला होता. याचवेळी या भरधाव इनोव्हा कारने या छोटा हत्ती टेम्पोला पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी प्रचंड होती की इनोवा कार हवेमध्ये उडून तीन वेळा पलटी झाली यामध्ये दिव्या भोसले आणि देविका भुते या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी तात्काळ कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रस्त्यावर अक्षरशः काचांचा थर पडला होता. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दिव्या भोसले हिचा मृत्यू झाला तर देविका भुते हिच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद हातकणंगले पोलिसात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नाही.