

कासारवाडी : सादळे (ता. करवीर) घाटात झालेल्या भीषण अपघातात निकमवाडी (ता. पन्हाळा) येथील मोटारसायकलस्वार नारायण सदाशिव खोत (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी (दि.७) सायंकाळी सुमारे पाच वाजता ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नारायण खोत हे पेठ वडगाव येथील मार्केटमध्ये हमालीचे काम करीत होते. अपघाताच्या दिवशी ते नेहमीप्रमाणे सकाळी कामासाठी गेले होते. दिवसभराचे काम आटोपून ते सायंकाळी कासारवाडीमार्गे निकमवाडीकडे परतत होते. दरम्यान, सादळे घाटातील जुन्या जेनिसिस कॉलेजच्या पाठीमागील वळणावर टोपच्या दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांच्या मोटारसायकलला समोरून जबर धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर टेम्पो चालक वाहनासह पसार होण्याचा प्रयत्न करीत असताना मागून येणाऱ्या नागरिकांनी तत्परतेने पाठलाग करून कासारवाडी येथे टेम्पो अडविला. घटनेची माहिती मिळताच मृत नारायण खोत यांचे नातेवाईक, विशेषतः कासारवाडी येथे वास्तव्यास असणारी त्यांची बहिण घटनास्थळी दाखल झाली.
अपघाताची नोंद होताच शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे स.पो.नि. सुनील गायकवाड पथकासह घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला.