

सिद्धनेर्ली : कागल-मुरगूड मार्गावरील व्हॅनूर (ता.कागल) गावाजवळ आज पहाटेच्या सुमारास बकरी वाहतूक करणाऱ्या एका ट्रकचा ( KA11D 0927 ) भीषण अपघात झाला. मुंबईहून गारगोटेरीकडे निघालेल्या या ट्रकमध्ये असलेल्या सुमारे ३५० बकऱ्यांपैकी २०० हून अधिक बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात व्हॅनूरजवळील पुलाच्या अगदी जवळ झाला. पुलाजवळील तीव्र वळणावर ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेल्या वेगात ट्रक थेट पुलाच्या कठड्याला धडकला आणि पुढे तोल जाऊन रस्त्यावर पलटी झाला. अपघाताच्या भीषणतेमुळे ट्रकमधील बकऱ्या मोठ्या प्रमाणावर जखमी झाल्या आणि २०० हून अधिक बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.
हा ट्रक कर्नाटकातील गारगोटेरीकडे निघाला असला, तरी या बकऱ्यांची अंतिम वाहतूक बेंगलोर येथे केली जात होती, अशी समोर आली आहे. बेंगलोरसारख्या मोठ्या शहरांमध्ये मटणाचे दर एक हजार रुपयांहून अधिक असल्याने महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात बकऱ्यांची वाहतूक केली जाते. मात्र, या वाहतुकीत अनेकदा आरटीओ (RTO) नियमांचे उल्लंघन केले जाते.
अपघातात पलटी झालेला हा ट्रक तीन मजली कंटेनर प्रकारचा होता. आरटीओची कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना आणि शासनाचा कर (टॅक्स) चुकवण्यासाठी अशा धोकादायक तीन मजली कंटेनरमधून बकऱ्यांची वाहतूक मुरगुडमार्गे कर्नाटकात (कर्नाटक सीमेत) प्रवेश करतात. दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थानिक व्यावसायिक आरटीओची परवानगी घेऊन बकरी वाहतुकीसाठी लहान टेम्पो वापरतात. मात्र, अधिक नफ्यासाठी आणि टॅक्स चुकवण्यासाठी केलेली ही धोकादायक वाहतूकच या भीषण अपघातास कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे.
अपघातानंतर तातडीने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. ट्रक पलटी झाल्यामुळे आतमध्ये दबलेल्या जिवंत बकऱ्यांना बाहेर काढण्यात आले आणि त्यांना दुसऱ्या वाहनातून पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आले. या घटनेची नोंद कागल पोलिसांनी घेतली असून, अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास पोलीस करत आहेत. या अपघातामुळे संबंधित बकरी मालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, या रस्त्यावरील काही वळणे धोकादायक बनली आहेत. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने या धोकादायक वळणांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे.