कोल्हापूर

कोल्हापूर : जुने पारगाव येथे पुराच्या धास्तीने शेतकरी महिलेचा मृत्यू

अविनाश सुतार

कासारवाडी: पुढारी वृत्तसेवा : जुने पारगाव (ता. हातकणंगले) येथील रेखा शिवाजी मोहिते (वय ६०) यांचे वारणा नदीच्या पुराचे पाणी घरात शिरेल, या धास्तीने मृत्यू झाला. त्या जनावरांसाठी ओला चारा साठवणूक करून ठेवण्यासाठी शेतात गेलेल्या असताना त्या चक्कर येऊन पडल्या. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. पुराच्या धास्तीने शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वारणा नदीच्या काठावर जुने पारगाव गाव आहे. येथील पोलीस पाटील गल्ली आणि परिसरात दरवर्षी वारणा नदीच्या पुराचे पाणी येते. घरात पुराचे पाणी येत असल्यामुळे येथील ग्रामस्थांना जनावरांसह स्थलांतरीत व्हावं लागते. मागील वर्षी अचानक पाण्यात वाढ झाल्याने एका रात्रीत लोकांना स्थलांतर व्हावे लागले होते. या वर्षीही काही दिवसांपासून वारणा नदी पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

नदीचे पाणी केव्हा घरात घुसेल, हे सांगता येत नसल्याने रेखा  तणावात हाेत्‍या,  त्यामुळे त्या मुलासोबत सोमवारी जनांवरासाठी ओला चाऱ्याची साठवणूक करण्यासाठी निलेवाडी रस्त्यावरील बिरोबा मंदिराजवळ शेतात गेल्या होत्या. यावेळी चारा काढत असताना त्यांना चक्कर आल्याने त्या पडल्या. त्यावेळी तेथे उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी कोडोली येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. स्वभावाने मनमिळाऊ असणाऱ्या रेखा यांचा पुराच्या धास्तीने असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT