कोल्हापूर : जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघांत मंगळवारी (दि. 29) अखेरच्या दिवशी तब्बल 131 उमेदवारांनी एकूण 188 उमेदवारी अर्ज भरले. काहींनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्ह्यातील दहा मतदारसंघांत आता एकूण 221 उमेदवारांचे 324 अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी अर्जांची छाननी होणार असून, सोमवारी (दि. 4) दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेता येणार आहे. यानंतर जिल्ह्यातील अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवार अखेरचा दिवस होता. यामुळे बहुतांशी सर्व मतदारसंघांत पक्षाकडून आणि अपक्षांनी चुरशीने उमेदवारी अर्ज दाखल केले. काहींनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले, तर काहींनी अत्यंत साधेपणाने अर्ज दाखल केला. काहींनी मतदारसंघातील समस्यांच्या निषेधार्थ हटके पद्धतीने येत उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांनीही गर्दी केल्याने निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कार्यालयाबाहेरील परिसर गर्दीने फुलून गेला होता.
चंदगड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून सुष्मिता पाटील, आमदार राजेश पाटील यांनी दोन, वंचित बहुजन आघाडीतून अर्जुन धुंडगेकर, जनसुराज्य शक्तीतून मानसिंग खोराटे यांनी दोन, भारतीय कामगार पार्टीतून नारायण वाईंगडे, संभाजी बिग्रेड पार्टीतून परशराम कुतरे यांनी, तर अपक्ष म्हणून गोपाळराव पाटील, अशोक आर्दलकर, मोहन पाटील, जावेद अंकली, तुलसिदास जोशी, रमेश कुतरे, सुष्मिता पाटील, प्रकाश कागले, विलास नाईक, केदारी पाटील, राजेश पाटील, समीर नदाफ अशा एकूण 28 उमेदवारांनी 45 अर्ज भरले.
राधानगरीतून शिवसेनेतून प्रकाश आबिटकर यांनी एक, तर अपक्ष म्हणून एक अर्ज मंगळवारीही भरला. बहुजन समाज पार्टीतून पांडुरंग कांबळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून युवराज येडुरे, संभाजी बि—गेड पार्टीतून शहाजी देसाई यांनी अर्ज भरले. के. पी. पाटील, ए. वाय. पाटील यांच्यासह राजेंद्र ऊर्फ आर. वाय. पाटील, आशिष पाटील, कृष्णात अरबुने, कुदरतुल्ला लतिफ, सचिन पाटील, इरफान चाँद, चंद्रशेखर पाटील यांनी अपक्ष म्हणून असे एकूण 15 उमेदवारांनी 28 अर्ज भरले.
कागलमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून समरजितसिंह घाटगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून हसन मुश्रीफ, बहुजन समाज पार्टीतून अशोक शिवशरण, मनसेतून रोहन निर्मल, वंचित बहुजन आघाडीतून धनाजी सेनापतीकर यांनी अर्ज भरले. नवोदिता घाटगे, अॅड. सौ. कृष्णाबाई चौगुले, साताप्पा कांबळे, सुधीर शिवाणे, विनायक चिखले, राजू कांबळे, प्रवीण पाटील, अमन आवटे, हिंदुराव अस्वले, अभिजित तापेकर, विक्रम घाटगे, प्रकाश बेलवडे, याकुब बेलीफ, बाबासो कागलकर यांनी अपक्ष म्हणून अशा एकूण 24 उमेदवारांनी 33 अर्ज दाखल केले.