Madhuri Misal News: पर्वती विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी सोमवारी (दि.28) शक्तिप्रदर्शन करत निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. पर्वतीमध्ये सोमवारअखेर 12 उमेदवारांनी 20 अर्ज दाखल केले आहेत.
सारसबागमधील गणपती आणि महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन मिसाळ यांच्या पदयात्रेला प्रारंभ झाला. तत्पूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मार्केट यार्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पद्मावती, अण्णा भाऊ साठे स्मारक, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, बाळासाहेब ठाकरे स्मारक, अहिल्यादेवी होळकर स्मारक या ठिकाणी महापुरुषांना अभिवादन केले.
मिसाळ यांच्यासमवेत उमेदवारी अर्ज भरताना केंद्रीय सहकार आणि हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी खासदार प्रदीप रावत, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, निवडणूक प्रमुख दीपक मिसाळ, गणेश बीडकर, सुभाष जगताप, श्रीकांत पुजारी, करण मिसाळ, प्रवीण चोरबेले व अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
मिसाळ म्हणाल्या, सलग चौथ्यांदा भाजपच्या नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. गेली पंधरा वर्षे केलेली विकासकामे आणि सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने विजयी होऊ, असा विश्वास वाटतो.