कोल्हापूर

Kopeshwar temple khidrapur encroachment : कोपेश्वर मंदिर अतिक्रमण वाद: परिसरातील ७१ कुटुंबांच्या रक्षणासाठी समिती सरसावली

जुने फोटो, फेरफार उतारे, घरकुल लाभासह सर्व पुरावे संकलनाला वेग, ६ तारखेला न्यायालयात म्हणणे सादर करण्यासाठी ग्रामस्थांची युद्धपातळीवर तयारी

पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड : कोपेश्वर मंदिर परिसरातील कथित अतिक्रमण प्रकरणात न्यायालयाने नोटीस बजावलेल्या खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील ७१ घरांच्या बचावासाठी ग्रामस्थांनी आता न्यायालयीन लढा अधिक सक्षम करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी स्वतंत्र समितीची स्थापना करण्यात आली असून, न्यायालयात भक्कम बाजू मांडण्यासाठी आवश्यक असलेली सर्व जुनी कागदपत्रे, छायाचित्रे आणि शासकीय नोंदी संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये येत्या ६ तारखेला संबंधित घरांबाबत ग्रामस्थांची बाजू मांडण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने समितीने प्रत्येक घराशी संपर्क साधून पिढ्यानपिढ्या वास्तव्याचे पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. गावातील जुने फोटो, सातबारा, फेरफार उतारे, प्रॉपर्टी कार्ड, मालकी हक्काची कागदपत्रे, ग्रामपंचायतीच्या नोंदी, करपावत्या, वीज जोडणीचे पुरावे, शासकीय घरकुल योजनेंतर्गत मिळालेल्या लाभाची कागदपत्रे तसेच विविध शासकीय विभागांनी वेळोवेळी दिलेली प्रमाणपत्रे संकलित केली जात आहेत.

ही घरे अलीकडील नसून अनेक पिढ्यांपासून अस्तित्वात आहेत. काही कुटुंबांची चौथी पिढी आजही त्याच घरात राहत असून, शासनानेही विविध योजनांमधून लाभ दिलेला आहे. त्यामुळे या घरांना अतिक्रमण म्हणणे वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

समितीतील सदस्यांनी प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या मालकीशी संबंधित उपलब्ध असलेले सर्व पुरावे तातडीने सादर करण्याचे आवाहन केले आहे. अनेक वर्षांपूर्वीचे छायाचित्रे, महसूल अभिलेख, फेरफार नोंदी, कर भरल्याच्या पावत्या, तसेच शासनाच्या योजनांचा लाभ घेतल्याचे दस्तऐवज न्यायालयीन सुनावणीत महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास समितीने व्यक्त केला.

यापूर्वी गावबंद, पर्यटक प्रवेशबंदी आणि महिलांचे भजन आंदोलन अशा विविध मार्गांनी ग्रामस्थांनी आपला निषेध नोंदविला आहे. आता आंदोलनासोबतच कायदेशीर लढाही अधिक प्रभावीपणे लढण्यावर भर देण्यात येत असून, त्यासाठी आवश्यक असलेले सर्व पुरावे एकत्रित करून सक्षम कायदेशीर मांडणी करण्याच्या दृष्टीने समिती पूर्ण क्षमतेने कार्यरत झाली आहे.

ग्रामस्थांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, हा संघर्ष कोणत्याही विभागाविरोधात नसून पिढ्यानपिढ्या जपलेल्या आपल्या घरांच्या आणि अस्तित्वाच्या संरक्षणासाठी आहे. न्यायालयात वस्तुस्थितीचे सर्व पुरावे सादर करून न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करत ग्रामस्थांनी आपला लढा अखेरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT