कागल : येथे पालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी व शाहू आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी श्रीमंत बापूसाहेब महाराज चौकात आयोजित प्रचार सभेत बोलताना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे. समोर मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक. Pudhari Photo
कोल्हापूर

Hasan Mushrif statement | कागलचा स्वर्ग केल्याशिवाय राहणार नाही

मंत्री मुश्रीफ यांचा विश्वास; सुसंस्कृत कागल घडविण्यासाठी युतीला साथ द्या : समरजितसिंह घाटगे

पुढारी वृत्तसेवा

कागल : विकासाच्या पटलावर कागलची वेगळी ओळख निर्माण झालेलीच आहे. समरजित घाटगे यांच्या सहयोगाने आणि कागलवासीयांच्या पाठबळावर कागल शहराला स्वर्ग बनविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

ऐतिहासिक वारसा असलेल्या कागल शहराला सुसंस्कृत घडविण्यासाठी आमची युती योग्यच आहे म्हणूनच युतीला साथ द्या, असे आवाहन समरजितसिंह घाटगे यांनी केले. कागलमध्ये श्रीमंत बापूसाहेब महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि छत्रपती शाहू आघाडीच्या विराट जाहीर प्रचार सभेत मंत्री मुश्रीफ व घाटगे बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले, राजकारण आणि समाजकारण लोकांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठीच करायचे असते. नगराध्यक्षांसह आमचे सर्वच नगरसेवक गोरगरिबांची काळजी घेतील आणि सर्वच लोककल्याणकारी योजना जनतेच्या घरादारापर्यंत अगदी चुलीपर्यंत नेतील. समरजितसिंह घाटगे यांच्या बरोबरचा गेल्या दहा-बारा वर्षांचा संघर्ष आता पूर्ण संपलेला आहे. आमचे सर्वच मतभेद गंगार्पण झाले आहेत, असेही ते म्हणाले.

शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, सुसंस्कृत कागल घडविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. कागलच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आमची युती झाली आहे. मंत्री मुश्रीफ व आमचे काम आपल्यासमोर आहे. आमचे कामच बोलते. त्यामुळे मुश्रीफ व राजे या कामाच्या ब्रँडच्या मागे राहा. महिलांना लघुउद्योग तर तरुणांना उद्योग व्यवसायासाठी प्रशिक्षण देऊन यशस्वी उद्योजक बनविणार तर गांजामुक्त कागल हे आपले ध्येय असल्याचे घाटगे यांनी स्पष्ट केले.

प्रा. संजय मंडलिक यांना सवाल करताना ते म्हणाले, मुश्रीफ यांच्याबरोबर तुम्ही युती केली की चांगली व आम्ही केली की ती अभद्र कशी? नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सविता माने म्हणाल्या, माझ्यासह सर्व नगरसेवकांना नेत्यांनी मोठ्या अपेक्षेने उमेदवारी दिली आहे. नागरिक आमच्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवतील. त्याला तडा जाऊ न देता समस्त कागलकरांना अभिमान वाटेल, असा कारभार करू.

जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, प्रकाश गाडेकर, अखिलेश घाटगे, जयवंत रावण, दीपक मगर, स्वरूपा जकाते, प्रा. मधुकर पाटील, विजय काळे यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र जाधव यांनी स्वागत केले. प्रवीण काळबर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नविद मुश्रीफ, बाबगोंड पाटील, चंद्रकांत गवळी, रमेश माळी, अशोक जकाते, सौरभ पाटील, संजय चितारी, दीपक मगर, नवल बोते आदी उपस्थित होते.

नागरिकांना कर सवलत मिळेल..!

कागलमधील प्रस्तावित सोलर सिस्टीमद्वारे ऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पामुळे खर्चात बचत होईल. सध्या पालिकेचे वीज बिलावर जवळपास एक कोटी रुपये वार्षिक खर्च होतात. हा खर्च वाचणार आहे. प्रकल्प प्रत्यक्ष कार्यान्वित झाल्यानंतर नगरपालिका प्रशासन नागरिकांना वीज बिलातील होणार्‍या बचतीमुळे करामध्ये सवलत देऊ शकते, असे मुश्रीफ म्हणाले.

आमची कॉलर ताठ राहील...

मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी आणि समरजितसिंह घाटगे यांची युती घडवून आणलेली आहे. कागल नगर परिषदेमध्ये आमच्या आघाडीला इतके प्रचंड बहुमत द्या की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे भेटायला जाताना आमची कॉलर ताठ राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT