

कोल्हापूर : नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका दारात आल्या आहेत. त्यामुळे अनेक महिने अलिप्त असलेले नेते, इच्छुक, माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते अचानक शहरात सर्वत्र दिसू लागले आहेत. लग्न, साखरपुडा, अंत्यविधी, दशक्रिया... कुठलाही कार्यक्रम असो, प्रत्येक ठिकाणी इच्छुक उमेदवार उपस्थिती नोंदवत आहेत. या उपस्थितीचाच उपयोग करून ते स्वतःच्या पक्षाचे आणि गटाचे ब्रँडिंगदेखील करण्याचे काम कसोशीने करत आहेत.
जिथे जनता, तिथे नेते!
गेल्या पाच वर्षांत क्वचितच सार्वजनिक कार्यक्रमांना फिरकणारे नेते आता मात्र दिवसातून 5-7 ठिकाणी लग्न समारंभांना जात आहेत. मोठ्या लग्नाला स्वतः हजर राहायचे आणि छोट्या कार्यक्रमांना नाममात्र उपस्थिती देऊन कार्यकर्त्यांना खूश करायचे, असा नियमित कार्यक्रम अनेक नेत्यांनी आखला आहे. शहरातील विविध गटांमध्ये निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमांना शंभर टक्के प्रतिसाद देण्याची स्पर्धाच रंगू लागली आहे. एखाद्या कार्यकर्त्याला आर्थिक अडचण असली, तर ती सोडवण्याची धडपडसुद्धा सुरू आहे. रात्री-अपरात्री कोणाच्या घरी दुःखद घटना घडली, तरी तेथे आवर्जून या इच्छुक उमेदवारांची वर्णी लागलेली दिसून येत आहे.
कुटुंबही मोहिमेत उतरले
कार्यक्रमांची संख्या वाढल्याने एकट्या इच्छुक उमेदवाराला सर्वत्र पोहोचणे कठीण होत आहे. त्यामुळे आता नेत्यांनी घरच्यांनाच राजकारणात उतरवले आहे. पत्नी, भाऊ, बहीण, मुले... ज्याला वेळ मिळेल, त्याला कार्यक्रम अलॉट केला जात आहे. प्रत्येक ठिकाणी कुटुंबातील कोणी ना कोणी उपस्थित राहिलेच पाहिजे, असा फॅमिली प्रोटोकॉल नेतेवर्गाने ठेवला आहे.
आकस्मिक संवेदनशीलता
दोन-तीन वर्षे सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे अनेक नेते आता अचानक लोकसंग्रह करताना दिसत आहेत. सामाजिक, धार्मिक अगदी कौटुंबिक कार्यक्रमांनाही येण्याचा धडाका सुरू आहे. केवळ आपली उपस्थिती दाखवून मतदारांमध्ये आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट दिसते. पाच वर्षे हवेत असलेले हे नेते आता प्रत्यक्ष जमिनीवर उतरल्याचे चित्र निर्माण झाले आहे.