उत्तूर : चित्रीकार स्व. बाबासाहेब कुपेकर यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून आंबेओहोळ प्रकल्पाकडे पाहिले जाते. त्यांच्या पश्चात निधीअभावी रखडलेल्या या प्रकल्पासाठी 227.54 कोटी निधी उपलब्धतेतून या प्रकल्पाच्या पूर्णत्वाचे भाग्य मला लाभले; मात्र पालकमंत्र्यांनी 27 बैठका घेऊनही या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन प्रश्वन प्रलंबित का? असा सवाल उपस्थित करत आमदारकीची एक संधी द्या, पहिल्याच बैठकीत हा प्रश्न मार्गी लावतो, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित घाटगे यांनी केले. होन्याळी (ता. आजरा) येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच स्मिता पाटील होत्या.
घाटगे म्हणाले, मतदारसंघाच्या विभाजनानंतर उत्तूर विभागात स्व. कुपेकर यांनी पालकमंत्र्यांना पुढे केले. आंबेओहोळ प्रकल्पाच्या पूर्णत्वातून कुपेकर यांचे स्वप्न पूर्ण करण्याची त्यांची जबाबदारी होती; मात्र पंचवीस वर्षे आमदार व जलसंपदा खात्याचे मंत्री असतानाही त्यांनी या प्रकल्पाच्या पूर्णत्वाकडे दुर्लक्ष केले. आम्ही निधी उपलब्ध केल्यानंतर या धरणाचे काम पूर्ण झाले. निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्री पुनर्वसनासाठी निधी उपलब्ध झाल्याचे पत्र वाटप करतात. आचारसंहितेमध्ये अशा पत्रांचे वाटप करून ते शेतकर्यांच्या भावनांशी खेळत आहेत. तालुक्यातील विकासकामांप्रमाणे या पुनर्वसनाच्या प्रश्नातही त्यांचे ठेकेदार शेतकर्यांच्या जमिनीवर डोळा ठेवून आहेत.
ठाकरे गटाचे भिकाजी मोरबाळे म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित घाटगे यांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिक जीवाचे रान करतील. यावेळी एस. एस. पाटील, उपसरपंच तानाजी गुरव, सचिन उंचावळे, संगीता देऊस्कर, जयश्री जाधव, शंकर कांबळे, संजय कांबळे, युवराज पाटील आदी उपस्थित होते.