श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी डावलेले आ. लहू कानडे हे आता राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हावर निवडणूक रिंगणात दिसणार आहेत. तर, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनाही महायुतीतील शिंदे शिवसेनेकडून एबी फॉर्म मिळाला आहे. त्यामुळे महायुतीत सुरू असलेला हा उमेदवारीचा जांगडगुत्ता पक्षश्रेष्ठी नेेमका कसा सोडविणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, शिंदे गटाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे सुुपूत्र प्रशांत लोखंडे यांनीही येथे उमेदवारी अर्ज भरून ठेवलेला आहे.
आमदार लहू कानडे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्यासाठी बरेच प्रयत्न केले मात्र त्यांचे तिकीट अचानक कापले. त्यांचे तिकीट काँग्रेस सरचिटणीस हेमंत ओगले यांच्या पारड्यात पडल्यामुळे कानडे हे नाराज झाले होते. कानडे यांनी महायुतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. श्रीरामपूरची जागा शिंदे शिवसेना यांच्याकडे होती मात्र राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या मदतीने ही जागा राष्ट्रवादी (एपी) गटाकडे खेचून आणत या ठिकाणी आमदार लहू कानडे यांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश करून त्यांना तिकीट देण्यात आले. कानडे यांनी एबी फॉर्म घेतला असून आज मंगळवारी ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
दरम्यान, अवघ्या 24 तासात झालेल्या या घडामोडींमुळे श्रीरामपूर मतदारसंघातील निवडणूक आता वेगळ्या वळणावर येवून पोचली आहे. सहाजिक राजकीय उलथापालथीमागे स्थानिक संस्थानिक नेत्यांनी पडद्यामागे केलेल्या राजकीय घडामोडींचे मोठी खेळी आहे, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे ही जागा महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असताना ही जागा अजित पवार यांना मिळाली आहे. महायुतीत ही जागा पारंपारिकपद्धतीने शिवसेनेकडे होती. शिवसेनेकडून इच्छुकांची संख्या अधिक होती. त्यामुळे शिवसेनेत बंडखोरी होण्याची शक्यता होती. ती टाळण्यासाठी ही जागा शिवसेनेने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली, अशीही चर्चा झाली.
आता आमदार लहू कानडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर श्रीरामपूर मतदारसंघातून निवडणुकीला समोरे जाणार आहे. काँग्रेसने आमदार कानडे यांचे तिकीट कापले खरे, पण यामुळे कानडे आणि ओगले या दोघांनाही लॉटरी लागल्याची चर्चा रंगली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अहिल्यानगर जिल्ह्यात आणखी एक जागा वाढली आहे. शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला असला तरी शिवसेनेनेही या जागेवर दावा केलेला आहे.
आमदार कानडे यांनी अवघ्या 24 तासात महायुतीकडून उमेदवारी मिळवल्याने, श्रीरामपूरमधील राजकीय लढतीची चर्चा राज्यपातळीवर पोचली आहे. काल संध्याकाळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनाही शिंदे शिवसेनेकडून एबी फॉर्म मिळाल्याने तेही आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत. तसेच प्रशांत लोखंडे यांनीही काल शिवसेनेच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष असलेले अजित पवार हे कानडेंना उमेदवारी देतात आणि दुसरा घटक पक्ष असलेले एकनाथ शिंदे हे कांबळेंना एबी फॉर्म देतात, या गोंधळामुळे कार्यकर्तेही संभ्रमात सापडल्याचे चित्र आहे.
आरपीआयचे कट्टर समर्थक राजाभाऊ कापसे यांनी ही जागा महायुतीच्या कोट्यातून आरपीआयला मिळत नसल्यामुळे बंड पुकारले असून त्यांनी काल सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला व श्रीरामपूर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून अण्णासाहेब मोहन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.