Heavy rain in Kalammawadi, Tulsi dam areas
शिरोळ : येथील पंचगंगा नदीवरील बंधारा अशा प्रकारे पाण्याखाली गेला आहे. Pudhari File Photo
कोल्हापूर

काळम्मावाडी, तुळशी धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस

पुढारी वृत्तसेवा

राशिवडे : उशिरा हजेरी लावलेल्या पावसाने राधानगरी, तुळशी आणि काळम्मावाडी धरणक्षेत्रामध्ये जोरदार बॅटिंग केली आहे. गतवर्षच्या तुलनेमध्ये तीनही धरणांमध्ये दुपटीने पावसाची नोंद झाली आहे.

राधानगरी धरणक्षेत्रामध्ये गत चोवीस तासांमध्ये सर्वाधिक 123 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तर त्या पाठोपाठ काळम्मावाडी धरण क्षेत्रामध्ये 83 मि. मी. तर तुळशी धरणक्षेत्रामध्ये 74 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे तिन्ही धरणांमध्ये घटलेल्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होत चालली आहे. सध्या राधानगरी धरणामध्ये 2.65 टी. एम. सी., तुळशी धरणामध्ये 1.35 टी. एम. सी., तर काळम्मावाडी धरणामध्ये 4.73 टी. एम. सी. पाणीसाठा झाला आहे. दि. 1 जून 2024 पासून तिन्ही धरणक्षेत्रांमधील पावसाची नोंद मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे- कंसात गतवर्षीची : राधानगरी 887 मि. मी. (479), तुळशी 544 मि. मी. (269), आणि काळम्मावाडी 716 मि. मी. (298).

जयसिंगपूर : जिल्ह्यात व धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे जिल्ह्यातील कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा, वेदगंगा, कासारी या नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे शिरोळ येथील पंचगंगा नदीवरील बंधारा या पावसात पहिल्यांदाच मंगळवारी पाण्याखाली गेला. त्यामुळे जुन्या कुरुंदवाड मार्गावरील वाहतूक बंद झाली.

सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र वरुण राजाने दमदार सुरुवात केली आहे. विशेषत: धरण व पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. परिणामी, शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीवरील शिरोळ, तेरवाड आणि कृष्णा नदीवरील कनवाड हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर राजापूर येथील बंधारा रात्री उशिरा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यामुळे या बंधार्‍यांवरून होणारी वाहतूक बंद झाली आहे. तालुक्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तसेच तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे.

पाटगाव धरणामध्ये 85 मि. मी. पावसाची नोंद

भुदरगड तालुक्यातील पाटगाव धरणक्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये 85 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे, तर दि. 1 जूनपासून सर्वाधिक 1,571 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी या दरम्यान 954 मि. मी. पावसाची नोंद होती. धरणामध्ये 1.67 टी. एम. सी. पाणीसाठा आहे.

SCROLL FOR NEXT