खडकवासला धरणसाखळीवर पाऊस रुसला!

अतिवृष्टीच्या पानशेत खोर्‍याकडे पाठ; गेल्या आठ दिवसांत जलसाठ्यात किंचित वाढ
Khadakwasla Dam
खडकवासला धरणपुढारी

खडकवासला : अतिवृष्टीच्या पानशेत, वरसगावसह मुठा, सिंहगड खोर्‍यांवर यंदा मान्सून रुसला आहे. जून महिना संपत आला तरी जोरदार पाऊस नसल्याने खडकवासला धरणसाखळीत आठ दिवसांत 0.05 टीएमसी इतकी किंचित वाढ झाली. गुरुवारी चार धरणांच्या खडकवासला साखळीत 3.61 टीएससी म्हणजे केवळ 12.38 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता.

हवामान खात्याचा अंदाज चुकीचा?

हवामान खात्याकडून घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. असे असले तरी रायगड जिल्ह्यालगतच्या पानशेत, वरसगाव खोर्‍यात अद्यापही जोरदार पाऊस पडला नाही. गेल्या आठवड्यात 21 जून रोजी धरण साखळीत 3.56 टीएमसी इतका पाणीसाठा होता.

गेल्या आठ दिवसांपासून पानशेत वरसगाव खोर्‍यात पावसाळी वातावरण कायम आहे. तुरळक पावसानंतर जोरदार वारे वाहत आहेत त्यामुळे पाऊस गायब होत आहे. गुरुवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाचपर्यंत टेमघर येथे 4, पानशेत व वरसगाव येथे प्रत्येकी 7 व खडकवासला येथे 2 मिलीमीटर इतका अल्प पाऊस पडला.

पानशेत, वरसगाव धरण खोर्‍यातील रायगड जिल्ह्यालगतच्या घाटमाथ्यावरील दापसरे, टेकपोळे, शिरकोली, तव, आडमाळ दासवे, धामण ओहोळ भागांत रिमझिमीनंतर पाऊस गायब होत आहे. त्यामुळे अद्यापही ओढे, नाले व नद्यांतून मोठे प्रवाह सुरू झाले नाहीत. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणसाखळीत अर्धा टीएमसी कमी पाणी आहे. गेल्या वर्षी 27 जून रोजी धरणसाखळीत 4.17 टीएमसी म्हणजे 14.26 टक्के इतके पाणी होते.

भातलागवडीलाही फटका

दरवर्षी आम्ही भात रोपांच्या लागवडी करून आषाढी वारीला जातो. यंदा दोन दिवसांवर पालखी सोहळा आला तरी जोरदार पाऊस पडला नाही. ओढे, नाले कोरडे असल्याने भात रोपांच्या लागवडीसाठी भात खाचरात पुरेसे पाणी नसल्याचे पानशेत धरण खोर्‍यातील भालवडी (ता. राजगड) येथील शेतकरी सदाशिव बांदल यांनी सांगितले.

वरसगाव-पानशेत खोर्‍यात अद्याप जोरदार पाऊस सुरू झाला नाही. त्यामुळे धरणसाठ्यात वाढ झाली नाही. केवळ किंचित भर पडली आहे. धरणसाखळीत अल्प पाणीसाठा असल्याने पुणे महापालिकेला कळविण्यात आले आहे. त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय महापालिका घेईल.

मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news