Naveed Mushrif Elected Gokul President Mahayuti Kolhapur Politics
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी नविद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी शुक्रवारी (दि. 30) संचालक मंडळाची सभा गोकुळ शिरगाव येथील मुख्य कार्यालयात झाली. या निवडीमुळे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांना धक्का मानला जात आहे. दरम्यान, निवडीनंतर मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांकडून गोकुळ कार्यालयाबाहेर गुलालाची उधळण करत घोषणाबाजी करण्यात आली. निवडीनंतर नविद मुश्रीफ यांना अध्यक्ष महायुतीचा का, महाविकास आघाडीचा ? असा प्रश्न केला असता त्यांनी 'हम सब एक है', अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
महायुतीने आमदार सतेज पाटील यांना धक्का देत डावच उलटवला. अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेले शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव शेवटच्या क्षणी महायुतीच्या नेत्यांच्या दबावाने मागे पडले. महायुतीकडून नविद मुश्रीफ, अंबरिश घाटगे, अमरसिंह पाटील व अजित नरके यांची नावे अध्यक्षपदासाठी पुढे आली होती. अखेर नाविद मुश्रीफ यांच्या गळात अध्यक्षपदाची माळ पडली.
‘गोकुळ’ अध्यक्षपदाच्या निवडीबाबत सोमवारी झालेल्या बैठकीत नेत्यांनी अध्यक्षपदाच्या निवडी दिवशी पार्टी मिटिंग घेऊन नाव जाहीर केले जाईल, असे सांगितले होते; परंतु निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अचानक नेत्यांनी घेतलेल्या बैठकीमुळे ‘गोकुळ’ अध्यक्षपदाच्या निवडीत ट्विस्ट निर्माण झाला होता. सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत घमासान चर्चा झाली होती. परंतु, अध्यक्षपदाचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर शासकीय विश्रामधाम येथे सोमवारी ‘गोकुळ’चे नेते हसन मुश्रीफ, सतेज पाटील व डॉ. विनय कोरे यांची बैठक झाली होती. या बैठकीतून कोरे लगेच बाहेर पडले होते. त्यानंतर मुश्रीफ व पाटील यांनी ‘गोकुळ’ अध्यक्षपदासाठी सर्वमान्य नाव होईल, असे आम्ही निश्चित करू, असे सांगितले होते. त्यावेळी शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव जवळजवळ निश्चित होते. अध्यक्ष निवडी दिवशी गोकुळ शिरगाव येथे पार्टी मिटिंग घेऊन नाव निश्चित करण्यात येईल, असे मुश्रीफ व पाटील यांनी सांगितले होते.
परंतु, अचानक ‘गोकुळ’ अध्यक्षपदाच्या नावावर चर्चा करण्यासाठी नेते गुरुवारी सायंकाळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकत्र जमले. सर्व संचालकांनाही निमंत्रण देण्यात आले होते. या बैठकीस पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, के. पी. पाटील, संजय घाटगे उपस्थित होते.
‘गोकुळ’ अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार देत अरुण डोंगळे यांनी बंड पुकारल्यापासून ‘गोकुळ’ अध्यक्षपदाची निवड गाजत आहे. काही दिवसांतच डोंगळे यांचा राजीनामा घेण्यात ‘गोकुळ’च्या नेत्यांना यश आले. परंतु, अध्यक्ष महायुतीचा असावा, असे सांगून ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडीत नेत्यांचीच त्यांनी अडचण केली. अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख जाहीर झाल्यानंतर हालचाली सुरू झाल्या. यावेळी सतेज पाटील गटाकडे अध्यक्षपद होते. चुयेकर यांचे नावही निश्चित झाले होते; परंतु महायुतीचा अध्यक्ष करण्याबाबत मुश्रीफ यांच्यावर दबाव आल्याने नेत्यांना नाव निश्चित करण्यासाठी तातडीने गुरुवारी बैठक घ्यावी लागली.