‘गोकुळ’ अध्यक्ष उमेदवार बदलण्यासाठी मुश्रीफ, आबिटकर, कोरे यांच्यावर दबाव

थेट मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महायुतीच्या अध्यक्षासाठी निरोप
Gokul’ Presidential Election
‘गोकुळ’ अध्यक्ष उमेदवार बदलण्यासाठी मुश्रीफ, आबिटकर, कोरे यांच्यावर दबावFile Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यातील नेत्यांनी गोकुळच्या अध्यक्षपदासाठी निश्चित केलेल्या शशिकांत पाटील-चुयेकर यांच्या नावावर महायुतीच्या नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. चुयेकर हे महाविकास आघाडीचे तसेच सतेज पाटील यांचे खंदे समर्थक मानले जाणारे त्याचबरोबर गोकुळमध्ये सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांची युती भक्कम मानली जाते. गोकुळ संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या काळात जर अध्यक्षपद महाविकास आघाडीकडे राहिले तर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी सावध पावले टाकली.

चुयेकर यांचे नाव निश्चित झाले. तेव्हापासूनच त्यांच्या विरोधातील मोहीम सुरू झाली. अरुण डोंगळे यांनी बंडाचा झेंडा उभारला तेव्हा धनंजय महाडिक यांनी गोकुळचे राजकारण बदलते आहे बरेच काही पहायला मिळेल, असे सूचक वक्तव्य केले होते.

एका बाजूला नेत्यांनी अरुण डोंगळे यांचे बंड शमवले असले तरी शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव ते पुढे रेटू शकलेले नाहीत. धनंजय महाडिक यांनी गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी भूमिका बजावल्याचे सांगण्यात येते. नाव निश्चित झाल्यानंतर निवडीच्या आधी दोन दिवस नेत्यांना मुंबईतून फोन आले आणि चर्चेसाठी पाचारण करण्यात आले. ही चर्चा नेत्यांत झाली; मात्र त्यासाठी हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर व विनय कोरे यांच्यावर अध्यक्षपदाचा उमेदवार बदलासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी दबाव आणल्याचे समजते.

नेत्यांच्या आदेशानंतर हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, विनय कोरे व संजय घाटगे यांची मुंबईत बैठक झाली. उमेदवार बदलण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे उमेदवारांच्या संभाव्य नावावर चर्चा झाली.

यामध्ये हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद, विनय कोरे गटाचे अमर पाटील, चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके तसेच संजय घाटगे यांचे चिरंजीव अंबरिष यांच्या नावाची चर्चा आहे. नेत्यांनी नाव निश्चितीबाबतची कमालीची गुप्तता पाळली असून केवळ नेत्यांच्या बैठकीत नावांची चर्चा झाली. गोकुळच्या संचालकांनाही या चर्चेत घेतले गेले नाही व त्यांच्यापर्यंत हे नाव पोहोचू दिले नाही.

मुख्यमंत्र्यांकडून निरोपाची चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून गोकुळच्या नेत्यांना निरोप देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यानंतरच नेत्यांनी मुंबईत पहिली बैठक घेतली आणि एरव्ही शुक्रवारी कोल्हापुरात येणारे हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर हे नेते गुरुवारीच कोल्हापुरात दाखल झाले. या सर्व प्रक्रियेत एकनाथ शिंदे यांचीही भूमिका महत्त्वाची आहे.

... तर महायुतीच्या संचालकांची मोट बांधा

गोकुळ अध्यक्षपदासाठी निश्चित केलेले नाव बदलण्यात अडचण असेल तर महायुतीला मानणार्‍या सर्व संचालकांना एकत्र करा आणि कोणत्याही परिस्थितीत महायुतीचाच अध्यक्ष करा, असा थेट निरोप गोकुळचे नेतृत्व करणार्‍या नेत्यांना वरिष्ठांकडून देण्यात आला. त्यामुळे मुंबईत बुधवारी तातडीने घडामोडी घडल्या आणि शुक्रवारी येणारे नेते गुरुवारीच कोल्हापुरात धडकले.

परदेशातून परतल्याने नविद मुश्रीफ अध्यक्षपदाचे दावेदार

नविद मुश्रीफ यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. परदेशात गेलेले मुश्रीफ दि. 3 रोजी परतणार होते; मात्र हा दौरा अर्धवट टाकून ते गुरुवारीच कोल्हापुरात दाखल झाले. केडीसीसी बँकेत झालेल्या बैठकीवेळी अन्य संचालकांसमवेत ते उपस्थित होते.

गोकुळचे नेते आणि त्यांचे संचालक

सतेज पाटील यांना मानणारे संचालक : विश्वास पाटील, बाबासाहेब चौगले,

प्रकाश पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, बयाजी शेळके, अंजना रेडेकर.

विनय कोरे यांना मानणारे संचालक : कर्णसिंह गायकवाड व अमर पाटील.

के. पी. पाटील यांना मानणारे संचालक : रणजित पाटील व प्रा. किसन चौगले.

चंद्रदीप नरके यांना मानणारे संचालक : अजित नरके व एस. आर. पाटील.

प्रकाश आबिटकर यांना मानणारे संचालक : नंदकुमार ढेंगे.

पूर्वी त्यांना मानणारे अभिजित तायशेटे लोकसभा निवडणुकीपासून स्वतंत्र.

शिंदे गटाचे संचालक : अरुण डोंगळे, डॉ. सुजित मिणचेकर.

राहुल पाटील-सडोलीकर यांना मानणारे : बाळासाहेब खाडे.

महाडिक गटाचे संचालक : शौमिका महाडिक.

चेतन नरके, अमरिश घाटगे विरोधी आघाडीतून निवडून आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news