

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी 12 तास शिल्लक असताना महायुतीने आमदार सतेज पाटील यांना धक्का देत डावच उलटवला. अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेले शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव शेवटच्या क्षणी महायुतीच्या नेत्यांच्या दबावाने मागे पडले. महायुतीकडून नविद मुश्रीफ, अंबरिश घाटगे, अमरसिंह पाटील व अजित नरके यांची नावे अध्यक्षपदासाठी पुढे आली आहेत. मुश्रीफ परदेशातून नियोजित वेळेपूर्वी आल्याने त्यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे.
‘गोकुळ’ अध्यक्षपदाच्या निवडीबाबत सोमवारी झालेल्या बैठकीत नेत्यांनी अध्यक्षपदाच्या निवडी दिवशी पार्टी मिटिंग घेऊन नाव जाहीर केले जाईल, असे सांगितले होते; परंतु निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अचानक नेत्यांनी घेतलेल्या बैठकीमुळे ‘गोकुळ’ अध्यक्षपदाच्या निवडीत ट्विस्ट निर्माण झाले आहे. सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत घमासान चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी नाव निश्चित करण्यात आल्याचे सांगितले; पण ते त्यांनी गुलदस्त्यातच ठेवले.
‘गोकुळ’ अध्यक्षपदासाठी शुक्रवारी (दि. 30) संचालक मंडळाची सभा होत आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर शासकीय विश्रामधाम येथे सोमवारी ‘गोकुळ’चे नेते हसन मुश्रीफ, सतेज पाटील व डॉ. विनय कोरे यांची बैठक झाली होती. या बैठकीतून कोरे लगेच बाहेर पडले होते. त्यानंतर मुश्रीफ व पाटील यांनी ‘गोकुळ’ अध्यक्षपदासाठी सर्वमान्य नाव होईल, असे आम्ही निश्चित करू, असे सांगितले होते. त्यावेळी शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव जवळजवळ निश्चित होते. अध्यक्ष निवडी दिवशी गोकुळ शिरगाव येथे पार्टी मिटिंग घेऊन नाव निश्चित करण्यात येईल, असे मुश्रीफ व पाटील यांनी सांगितले होते. परंतु, अचानक ‘गोकुळ’ अध्यक्षपदाच्या नावावर चर्चा करण्यासाठी नेते गुरुवारी सायंकाळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकत्र जमले. सर्व संचालकांनाही निमंत्रण देण्यात आले होते. या बैठकीस पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, के. पी. पाटील, संजय घाटगे उपस्थित होते.
‘गोकुळ’ अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार देत अरुण डोंगळे यांनी बंड पुकारल्यापासून ‘गोकुळ’ अध्यक्षपदाची निवड गाजत आहे. काही दिवसांतच डोंगळे यांचा राजीनामा घेण्यात ‘गोकुळ’च्या नेत्यांना यश आले. परंतु, अध्यक्ष महायुतीचा असावा, असे सांगून ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडीत नेत्यांचीच त्यांनी अडचण केली. अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख जाहीर झाल्यानंतर हालचाली सुरू झाल्या. यावेळी सतेज पाटील गटाकडे अध्यक्षपद होते. चुयेकर यांचे नावही निश्चित झाले होते; परंतु महायुतीचा अध्यक्ष करण्याबाबत मुश्रीफ यांच्यावर दबाव आल्याने नेत्यांना नाव निश्चित करण्यासाठी तातडीने गुरुवारी बैठक घ्यावी लागली.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनात ही बैठक झाली. ही बैठक संपेपर्यंत नेत्यांनी कोणालाही प्रवेश दिला नव्हता. बैठक झाल्यानंतर त्यांनी संचलकांशी चर्चा केली. यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी, अध्यक्षपदाचे नाव निश्चित केले आहे. ते बंद पाकिटातून सभेमध्ये ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्यामार्फत पाठविण्यात येईल, असे सांगितले. विनय कोरे यांनी, पुढच्या वर्षी निवडणूक आहे त्यामुळे अध्यक्षपदाच्या नावावर सविस्तर चर्चा करून एकमताने नाव निश्चित केले असल्याचे सांगितले.
हसन मुश्रीफ यांनी, एकमताने अध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी, आगामी वर्षात ‘गोकुळ’ चांगले काम करेल, असे सांगितले.
बैठक झाल्यानंतर मुश्रीफ व पाटील यांना अध्यक्षपदाच्या नावाबाबत विचारले असता, मुश्रीफ म्हणाले, ‘हम सब एक है’; तर पाटील यांनी अध्यक्ष राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीचा होईल, असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले.