Gokul Election 2026 : राज्याच्या सहकार क्षेत्रातील बहुचर्चित 'गोकुळ' दूध संघ निवडणुकीतील जागावाटपाचा तिढा कायम राहिला आहे. महायुती म्हणून आम्ही एकत्र जाण्यासाठी तयार आहोत, मात्र सध्या तरी २१ सप्टेंबर रोजी सर्वच २५ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत, असे आज (दि. १९ सप्टेंबर) भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी स्पष्ट केले.
अद्याप जागावाटपासंदर्भातील कोणताही निर्णय झालेला नाही. गोकुळ निवडणुकीसाठी सर्व २५ जागांवर भाजपचे उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. यानंतर भाजप पक्षनेतृत्वांसमोर हा विषय मांडला जाईल. त्यानंतर ते याबाबत निर्णय घेतील, असेही अमल महाडिक यांनी सांगितले.
गोकुळ निवडणुकीत महायुती व काँग्रेसकडे सध्या मागील संचालक मंडळातील बहुतांश जणांना पुन्हा संधी मिळेल, अशी शक्यता आहे. महायुतीकडे सध्या १५ माजी संचालक आहेत. त्यामुळे येथे १० जणांना, तर काँग्रेसकडे सहा माजी संचालक असल्याने येथे तब्बल १९ नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. महायुतीमधील शिल्लक जागांमध्येही अनेक जागांवर नेते व त्यांचे वारसदार यांनाच संधी मिळेल, असे चित्र आहे.
राष्ट्रवादी: नवीद मुश्रीफ, अरुण डोंगळे, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, युवराज पाटील, वसंत ऊर्फ बाळासो खाडे.
शिवसेना (शिंदे गट) : विश्वास पाटील, अजित नरके, एस. आर. पाटील, डॉ. सुजित मिणचेकर.
जनसुराज्य: अमरसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड.
काँग्रेस: बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, बयाजी शेळके, अभिजित तायशेटे, प्रकाश पाटील, अंजना रेडेकर.