पुण्यातील लक्ष्मी रोड येथील विभागीय सहनिबंधक (दुग्ध) यांच्या कार्यालयासमोर तेनात केलेला बंदोबस्त  Pudhari
कोल्हापूर

Gokul Milk Societies Hearing | पोलीस बंदोबस्तात पुण्यात गोकुळच्या अवसायनातील दूध संस्थांची सुनावणी

३०० हून अधिक दूध संस्थांनी अवसायनाची कारवाई रद्द करण्यासाठी विभागीय सहनिबंधक (दुग्ध), पुणे यांच्याकडे दाद

पुढारी वृत्तसेवा

Pune Police Protection Defunct Milk Societies Hearing

आशिष पाटील

गुडाळ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या अवसायनातील दूध संस्थांच्या सुनावणीला पुण्यातील लक्ष्मी रोड येथील विभागीय सहनिबंधक (दुग्ध) यांच्या कार्यालयात शुक्रवारी (दि. १४) पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली. गोकुळच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या राजकीय शह-काटशहाच्या पार्श्वभूमीवर या सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

गोकुळचे सभासद असलेल्या काही संलग्न दूध संस्थांवर अवसायनाची कारवाई करण्यात आल्याचा आरोप संबंधित संस्थांकडून करण्यात आला आहे. ही कारवाई रद्द करण्यासाठी १९४ दूध संस्थांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे धाव घेतली होती. नुकत्याच झालेल्या सुनावणीत या संस्थांवरील अवसायनाची कारवाई रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान, उर्वरित संस्थांपैकी ३०० हून अधिक दूध संस्थांनी अवसायनाची कारवाई रद्द करण्यासाठी विभागीय सहनिबंधक (दुग्ध), पुणे यांच्याकडे दाद मागितली आहे. या प्रकरणांची सुनावणी आणि निर्णय प्रलंबित असून, शुक्रवारी अंतिम सुनावणी घेण्यात आली.

गोकुळची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने या प्रकरणाला अधिक महत्त्व आले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या धर्तीवर विभागीय सहनिबंधकांनी तातडीने सुनावणी घेऊन शुक्रवारीच निर्णय द्यावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील काही दूध संस्थांचे प्रतिनिधी पुण्यातील विभागीय सहनिबंधक कार्यालयात दाखल झाले.

या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी लक्ष्मी रोडवरील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पुणे शहर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संस्था प्रतिनिधींना कार्यालयात प्रवेश करण्यापासून पोलिसांनी दिवसभर रोखल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी चार वाजता सुनावणी पूर्ण झाली असून विभागीय सहनिबंधक देविदास मिसाळ यांच्या निर्णयाकडे गोकुळ प्रशासनासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT