

कोल्हापूर : कोल्हापूर सर्किट बेंचने अवसायनाचा आदेश रद्द केलेल्या १९४ दूध संस्थांचा मतदार यादीतील समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला असला, तरी त्यासाठी एका प्रक्रियेतून जावे लागणार आहे. संबंधित दूध संस्था मतदार यादीत समावेश करण्याबाबत सहायक निबंधक कार्यालयात लवकरच हरकत नोंदवणार आहेत. त्यांच्या हरकतीवर विभागीय उपनिबंधक काय निर्णय घेणार याकडे लक्ष असणार आहे.
सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी अवसायनाचा अंतिम आदेश कोल्हापूर सर्किट बेंचने बुधवारी रद्द ठरवला. यामुळे १९४ दूध संस्थांना मतदानाचा अधिकारी मिळणार, अशी चर्चा दिवसभर जिल्ह्यात सुरू होती. १९४ दूध संस्थांबरोबरच विभागीय उपनिबंधक देवीदास मिसाळ यांच्यासमोर अवसायनातीलच सुमारे ३०० दूध संस्थांची सुनावणी सुरू आहे. कोल्हापूर सर्किट बेंचच्या निर्णयानंतर शुक्रवारी (दि. १४) मिसाळ यांच्यासमोर होणार्या सुनावणीमध्ये या सस्थांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या संस्थांच्याही नजरा शुक्रवारच्या सुनावणीकडे असणार आहेत.
विभागीय उपनिबंधकांसमोर सुरू असणार्या अवसायनातील सुमारे ३०० संस्थांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, यादीवर हरकत दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यादीतील समावेशाबाबत संस्था हरकत नोंदविणार आहेत. त्यामुळे न्यायालयाने निर्णय दिलेल्या १९४ आणि विभागीय उपनिबंधकांसमोरील ३०० हून अधिक अशा सुमारे ५०० संस्थांचा अंतिम मतदार यादीत समावेश होणार हे जवळपास निश्चित आहे. संस्थांसाठी मंत्री हसन मुश्रीफ, आ. विनय कोरे, आ. सतेज पाटील यांनी विशेष प्रयत्न करत पाठबळ दिले होते. त्यामुळे संस्थांचा यादीत समावेश झाल्यास याचा फायदा या नेत्यांना होण्याची शक्यता आहे.
‘गोकुळ’ने चुकीच्या पद्धतीने नोंदणी केलेल्या ४१० दूध संस्थांचे सभासदत्व रद्द करण्यासंदर्भातील याचिका प्रकाश बेलवाडे यांनी सहकार न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेवर आज गुरुवारी (दि. १३) सुनावणी होत आहे. या सुनावणीकडेही संस्थांचे लक्ष असणार आहे.
कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये बुधवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने या कारवाईत संबंधित संस्थांना अंतरिम आदेशापूर्वी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली नव्हती. तसेच, अंतिम आदेश काढताना २०२३ आणि २०२६ मधील दूध संकलनाच्या नोंदींचा आधार घेतला आहे. नव्या कालावधीतील नोंदींच्या आधारे कारवाई करायची असल्यास स्वतंत्र प्रक्रिया राबविणे आवश्यक होते. तसेच, दूध संकलनासाठी प्रतिदिन ५० लिटरचा निकष ठेवण्यात आला होता. मात्र, बहुतांश याचिकाकर्त्या संस्थांमध्ये किरकोळ तफावत असल्याचे नोंदवत अशा किरकोळ कमतरतेसाठी विघटनासारखी कठोर कारवाई योग्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. कोल्हापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था दूध संकलन व पुरवठ्यावर अवलंबून असून, प्राथमिक दूध संस्थांना ‘गोकुळ’च्या निवडणुकीतून वगळण्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, असेही न्यायालयाने नमूद केले.
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत करवीर आणि राधानगरी तालुका निर्णायक ठरणार आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीमध्ये करवीर तालुक्यात सर्वाधिक ८२१, तर त्या पाठोपाठ राधानगरी तालुक्यात ६२२ ठराव आहेत. त्यामुळे हे दोन्ही तालुके निवडणुकीत लक्षवेधी ठरणार आहेत.
‘गोकुळ’च्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून, बुधवारी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक देविदास मिसाळ यांनी ४८९७ मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वच तालुक्यांत संस्था सभासदांकडून यादी चाळण्याचे काम दिवसभर सुरू होते. यादीमध्ये काही संस्थांची नावे नसल्यामुळे संस्था प्रतिनिधींसह नेत्यांकडून सहायक निबंधकांना यादीमध्ये नाव नसल्याबाबतची विचारणा होत होती.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता यादीवर हरकती मागविल्या जाणार आहेत. ताराबाई पार्क येथील सहायक निबंधक कार्यालयात हरकती दाखल करण्यासाठी २१ ऑगस्टपर्यंत मुदत असणार आहे. तर प्राप्त हरकतींवर सुनावणी घेऊन निर्णय घेण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ४ सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
प्रारूप मतदार यादीवर प्राप्त हरकतींवर २१ ऑगस्टनंतर सुनावणी होणार आहे. सहायक निबंधक कार्यालयातच ३१ ऑगस्टपर्यंत सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करून निर्णय घ्यावा लागणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक देविदास मिसाळ सुनावणी घेणार आहेत.