Gokul Chairman Arun Dongle Resignation
गुडाळ : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेले गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गुरुवारी (दि. २२) दुपारी एक वाजता होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष डोंगळे आपला राजीनामा सादर करणार आहेत. त्यानंतर तो मंजूर केला जाईल.
चंदगड येथे रविवारी हसन मुश्रीफ यांच्या सोबत झालेल्या चर्चेप्रमाणे डोंगळे यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना राजीनाम्याबाबत माहिती दिली. तर मंगळवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीतून त्यांच्या सोबत राजभवनात जाताना जिल्हा पातळीवर अध्यक्ष निवडीबाबत झालेल्या चर्चेची माहिती त्यांना दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही भेट घेऊन त्यांनी त्यांनाही सविस्तर माहिती दिली. तसेच सर्वानुमते ठरलेले नाव ही त्यांनी राज्य पातळीवरील तिन्ही नेत्यांच्या कानी घातले. त्यानंतर मंगळवारी दुपारी डोंगळे कोल्हापूरला रवाना झाले.
मुंबईला जाण्यापूर्वीच शुक्रवारी (दि. १६) त्यांनी राजीनाम्याचा विषय घालून संचालक मंडळ बैठकीचा अजेंडा तयार करून ठेवला होता. मुंबईत भेटीगाठी झाल्यानंतर त्यांनी गोकुळ प्रशासनाला संचालकांना अजेंडा पाठवण्याची सुचना केली. त्यानुसार गुरुवारी (दि.२२) दुपारी एक वाजता होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते आपला राजीनामा सादर करतील.
संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनामा मंजूर झाल्यानंतर हा राजीनामा डीडीआर (दुग्ध) पुणे यांच्याकडे पाठविला जाईल. त्यांच्या अंतिम मंजुरीनंतर तेथून हा राजीनामा राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे पाठवला जाईल. प्राधिकरणाने नवीन अध्यक्ष निवडीची तारीख दिल्यानंतर अध्यक्ष निवड होईल. दरम्यान, मंत्री मुश्रीफ हे एक जून रोजी परदेश दौऱ्यावर जात असून १२ जूननंतर परदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतरच नव्या अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता आहे.