

Hasan Mushrif vs Arun Dongle Gokul President Controversy
कोल्हापूर : जेव्हा गोकुळच्या निवडणुका लागतील, त्यावेळी वेगळा सारीपाट होऊ शकतो. तेव्हा प्रत्येकाने मांडावा, आता योग्य नाही, असे स्पष्ट करत गोकुळचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांना खुर्चीची हाव सुटलेली नाही. शब्द पाळायचा नाही, हा डोंगळे यांचा इतिहासच आहे, अशी टीका वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (दि.१६) येथे केली. ते पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, डोंगळे यांना सत्तेची खुर्ची सोडवत नाही. खुर्चीसाठी राजकारण आणले जात आहे. मात्र, माझे आजही डोंगळे यांना आवाहन आहे की, त्यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा द्यावा. गोकुळची निवडणूक आम्ही महायुती म्हणून नव्हे, तर शाहू आघाडी म्हणून लढलो आहे. महायुतीचा चेअरमन व्हावा, अशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची इच्छा असती, तर ते मला बोलले असते. मी सुद्धा महायुतीतला महत्त्वाचा घटक आहे.
सध्या तरी अरुण डोंगळे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत. मग चेअरमन पदाबाबत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे का गेले नाहीत. गोकुळ चेअरमन पदाबाबत मुंबईत गेल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे, असे मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केल्याने सत्तारूढ गटाच्या नेत्यांना धक्का बसला आहे. दरम्यान, कोल्हापुरातील गोकुळ कार्यालयात आज (दि.१५) होणाऱ्या बैठकीपूर्वी १९ संचालकांनी आपण सर्वजण एकत्र असल्याचा संदेश दिला आहे. बैठकीपूर्वी प्रशासकीय कार्यालयात सर्व संचालक एकत्र आले होते. मात्र, अरूण डोंगळे, आणि संचालिका शौमिका महाडिक अनुपस्थित होते. त्यामुळे सध्या तरी डोंगळे एकाकी पडल्याचे चित्र समोर आले आहे.