Gokul Election Nomination Forms
आशिष ल. पाटील
गुडाळ : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी सर्व गटांतून ७२ व्यक्तींनी अर्ज दाखल केले. यामध्ये सर्वसाधारण गटातून सर्वाधिक ४७ अर्ज दाखल झाले असून, त्यात गोकुळच्या १९ माजी संचालकांचा समावेश आहे. माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार सुजित मिणचेकर आणि जिल्हा बँकेचे माजी चेअरमन ए. वाय. पाटील यांनीही गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.
दरम्यान, आज २०७ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. त्यामुळे आतापर्यंत एकूण ८०७ अर्जांची विक्री झाली आहे. मात्र, विक्रीच्या तुलनेत प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे.
महिला गटातून आज १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये माजी संचालिका अंजना रेडेकर, ए. वाय. पाटील यांच्या पत्नी अर्चना, अभिजीत तायशेटे यांच्या पत्नी आरती, एस. आर. पाटील यांच्या पत्नी उमा, जिल्हा परिषद सदस्या शैलजा सतीश पाटील आणि सुहासिनी शिवाजी कवठेकर यांचा समावेश आहे.
इतर मागासवर्गीय गटातून दहा व्यक्तींनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये माजी संचालक विश्वासराव पाटील, अमरसिंह पाटील, एम. आर. पाटील कुरुकलीकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सतीश पाटील, शशिकांत खोत, वसंत धुरे आणि मोहन धुंदरे यांचा समावेश आहे.
अनुसूचित जाती गटातून दोन अर्ज दाखल झाले असून, त्यात माजी संचालक दिनकरराव कांबळे यांचा समावेश आहे. विमुक्त भटक्या जाती गटातून माजी संचालक बयाजी शेळके यांचा एकमेव अर्ज दाखल झाला.
सर्वसाधारण गटातून अर्ज दाखल करणाऱ्या ४७ व्यक्तींमध्ये १९ माजी संचालकांचा समावेश आहे. तसेच मागील निवडणुकीत सत्तारूढ आघाडीकडून पराभूत झालेले वीरेंद्र मंडलिक, विद्याधर गुरबे आणि महाबळेश्वर चौगले यांनीही अर्ज दाखल केले. भोगावतीचे संचालक ए. डी. पाटील, बिद्रीचे संचालक राहुल देसाई, सत्यजित जाधव, रणधीर मोरे, बाबासाहेब देवकर आणि सचिन घोरपडे यांचाही अर्जदारांमध्ये समावेश आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता २१ आणि २२ सप्टेंबर हे दोनच दिवस शिल्लक आहेत. भाजपच्या उमेदवारांनी अद्याप अर्ज दाखल केलेले नसल्याने आगामी दोन दिवसांत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेग घेण्याची शक्यता आहे