आशिष ल.पाटील
गुडाळ : गोकुळच्या निवडणुकी संदर्भात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल झालेल्या परस्परविरोधी याचिकांची सुनावणीआज गुरुवारी (दि. २) दुपारी होणार आहे. बहुचर्चित गोकुळ निवडणुकीचे भवितव्य ठरणाऱ्या या सुनावणीकडे जिल्ह्याच्या सहकार आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.
गोकुळचा निवडणूक कार्यक्रम संभाव्य अवसायनातील संस्थांच्या संदर्भात सुरू असलेली चौकशी पूर्ण झाल्याशिवाय सुरू करण्यात येऊ नये, अशा आशयाची याचिका वादग्रस्त 1195 संस्थांमध्ये समावेश असलेल्या काही संस्थांनी सोमवारी सर्किट बेंचमध्ये दाखल केली आहे. त्या पाठोपाठ गोकुळमधील अन्य काही सभासद संस्थांनी गोकुळचा निवडणूक कार्यक्रम विनाविलंब सुरू व्हावा अशी दुसरी याचिका सोमवारीच सर्किट बेंच मध्ये दाखल केली. निवडणूक वेळेत व्हावी अशी मागणी करणाऱ्या संस्थांच्या मागे सत्तारूढ आघाडी तर निवडणूक कार्यक्रम पुढे जावा अशी मागणी करणाऱ्या संस्थांच्या मागे विरोधी आघाडी असल्याची चर्चा आहे.
गुरुवारी सर्किट बँकच्या तालिकेवर 38 नंबरवर निवडणूक लांबणीवर जावी या मागणीची याचिका प्रथम सुनावणीस आहे. तर त्यानंतर 45 नंबरवर निवडणूक वेळेत व्हावी या याचिकेच्या सुनावणीचा क्रम आहे. सकाळी न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर दोन्ही याचिकांची एकत्रित सुनावणी व्हावी अशी मागणी होण्याची शक्यता आहे. सर्किट बेंचमध्ये न्या. माधव जामदार आणि न्या. नितीन पाटील यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. निकाल कुणाच्याही बाजूने लागला तरी त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तय्यारी दोन्ही बाजूंकडून झाल्याने गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेचा गुंता वाढत जाण्याची शक्यता आहे.