

आशिष पाटील
गुडाळ : 'गोकुळ' दूध संघाच्या १२शे संस्था अवसायानात काढण्याच्या प्रकरणाचा निकाल मंगळवारी (उद्या) सर्किट बेंचमध्ये अपेक्षित आहे. मात्र, हा निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरी दोन्ही गट सर्वोच्च न्यायालयात (सुप्रीम कोर्ट) जाण्याची शक्यता असल्याने गोकुळची निवडणूक लांबणीवर जाण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
वडकशिवाले येथील प्रकाश बेलवडे यांनी १२शे संस्थांच्या पात्रतेबाबत याचिका दाखल केली आहे. या संस्थांना मतदार यादीतून बाहेर ठेवण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू आहे. जून २०२३ मध्ये पशुसंवर्धन सचिव असताना तुकाराम मुंढे यांनी ५० लिटरपेक्षा कमी दूध संकलन असणाऱ्या संस्था अवसायानात काढण्याचे आदेश दिले होते. याच आदेशाचा आधार आता याचिकाकर्त्यांनी घेतला आहे. या वादामागे भाजप आणि राष्ट्रवादी (महायुती अंतर्गत) यांच्यातील अंतर्गत संघर्ष समोर येत आहे. ना. हसन मुश्रीफ यांनी यापूर्वी या संस्थांना स्थगिती मिळवून दिली होती, तर आता तीच स्थगिती रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही न्यायालयीन प्रक्रिया लांबली आणि मे महिन्यात विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपली, तर गोकुळवर प्रशासक नेमण्याच्या हालचालीही महायुतीमधील एका गटाकडून सुरू असल्याची चर्चा आहे.
१. मतदार यादी लांबणीवर: जोपर्यंत १२शे संस्थांचा निकाल लागत नाही, तोपर्यंत प्रारूप मतदार यादी अंतिम करणे कठीण आहे.
२. सुप्रीम कोर्टातील धाव: दोन्ही बाजूंनी सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी केल्याने ही प्रक्रिया कायदेशीर कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे.
३. नवे राजकीय समीकरण: या वादामुळे जिल्ह्यातील आगामी राजकारणात मोठी उलथापालथ होऊन नवी समीकरणे आकाराला येऊ शकतात.