

धीरज बरगे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळचे 1108 संस्था सभासद न्यायालयीन कचाट्यात सापडले आहेत. यासंदर्भात कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये 17 मार्च रोजी होणारी सुनावणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सुनावणीनंतर गोकुळ निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे. ठराव मागविण्याच्या प्रक्रियेपासून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यापर्यंतचा कार्यक्रम हा 120 दिवसांचा असतो. त्यामुळे सुनावणी पुन्हा लांबणीवर पडल्यास गोकुळची निवडणूकही लांबणीवर पडून ती वर्षाखेरीस होण्याची शक्यता आहे.
गोकुळशी संलग्न 1108 दूध संस्था सभासद हे बोगस असून या संस्था अवसायनात काढण्याच्या कार्यवाहीला तत्कालीन दुग्ध विकास मंत्री यांनी दिलेली स्थगिती उठवा अशी याचिका कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल केली आहे. याचिकेवर सुनावणी सुरु आहे. सुनावणीमुळे सद्यस्थितीत निवडणुक प्रक्रीया थांबली आहे. पण निवडणुक प्रक्रीया पुढे सुरु ठेवणे अथवा थांबविने याबाबत स्पष्टता नसल्याने सहाय्यक निबंधक (दुग्ध) कार्यालयाने सहकार निवडणुक प्राधिकरणकडे मार्गदर्शन मागविले आहे. निवडणुक प्राधिकरणाकडून निवडणुक प्रक्रीयेबाबत काय सूचना येणार याकडे लक्ष असणार आहे.
न्यायालयातून सुटणार पावसात अडकणार
गोकुळची मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम सहकार निवडणुक प्राधिकरणाच्या नियमानुसार साधारणत: 80 दिवसांचा आहे. यानंतर उमेदवारी दाखल करण्यापासून मतमोजणीची प्रक्रीया ही सुमारे 35 दिवसांची असते. हि सर्व प्रक्रीय पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यात पावसाला सुरुवात होणार आहे. परिणामी अतिवृष्टीच्या कारणामुळे गोकुळची निवडणुक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या कचाट्यातुन जरी सुटका झाली तरी पावसात निवडणुक अडकणार आहे.
प्रक्रिया थांबली
गोकुळने सादर केलेल्या यादीची छाननी पूर्ण झाली असून ठराव मागविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार होती. मात्र 1108 सभासदांबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने याचिकेला बाधा निर्माण होईल अशा कोणत्याही हालचाली न करण्याबाबत सांगितले आहे. त्यामुळे सहायक निबंधक कार्यालयाने सध्या निवडणूक प्रक्रिया थांबविली आहे. मार्च अखेर प्रक्रिया सुरू न झाल्यास निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.