बिरू व्हसपटे
शिरढोण : ग्रामीण भागातील नागरिकांना घरगुती गॅस सिलिंडर तब्बल ४५ दिवसांनी मिळत आहे. शहरी भागात मात्र २५ दिवसांत सिलिंडर उपलब्ध होत असल्याने शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागात संतापाची लाट पसरली आहे. ग्रामीण नागरिकांसाठी वेगळा निकष लावून त्यांच्यावर अन्याय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी लाकूड, शेणाच्या गोवऱ्या आदी इंधनाचे पर्यायी स्रोत उपलब्ध असल्याचे कारण देत ४५ दिवसांचा निकष लावला जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, हा निकष सध्याच्या परिस्थितीत पूर्णतः चुकीचा आणि ग्रामीण जनतेच्या अडचणींकडे डोळेझाक करणारा असल्याच्या भावना नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
महागाईच्या काळात घरगुती गॅस हा ग्रामीण कुटुंबांच्याही दैनंदिन जीवनाचा अत्यावश्यक भाग बनला आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भाग असा भेदभाव करून सिलिंडरच्या पुरवठ्याला वेगवेगळे निकष लावणे अन्यायकारक असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ४५ दिवसांची मुदत संपेपर्यंत सिलिंडर मिळत नसल्याने अनेक कुटुंबांना पर्यायी इंधनाचा आधार घ्यावा लागत आहे. ग्रामीण भागासाठी लागू असलेली ४५ दिवसांची अट तातडीने रद्द करून शहराप्रमाणे २५ दिवसांत गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.
... ग्रामीणांना दुजाभाव का? शहरातील नागरिकांना २५ दिवसांत गॅस सिलिंडर मिळत असताना ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी ४५ दिवसांचा निकष का? ग्रामीण भागात इंधनाचे पर्यायी स्रोत आहेत, हा दावा आता कालबाह्य असून नागरिकांच्या दैनंदिन गरजांकडे दुर्लक्ष करणारा आहे. शहर-ग्रामीण असा भेदभाव तातडीने थांबवून सर्व ग्राहकांना समान निकष लागू करावेत. त्याप्रमाणे गॅस सिलिंडर पुरवठा करावा.सातागोंडा उर्फ पोपटराव पुजारी, शिरढोण, जिल्हा अध्यक्ष भाजपा...