Piles of garbage in CPR
कोल्हापूर : सीपीआर प्रसूती व बर्न विभागाशेजारील कचर्‍याचा कंटेनरसह ट्रॉली भरून कचरा असा पडून आहे. Pudhari File Photo
कोल्हापूर

‘सीपीआर’मधील कचर्‍याचे मनपाला वावडे?

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : सीपीआर येथील कचरा उठावाकडे दुर्लक्ष झाल्याने कचर्‍याचे ढीग साचले आहेत. कंटेनरसह सुमारे पाच ट्रॉल्या कचरा पडून आहे. सीपीआरमधील कचरा प्रसूती विभागाच्या पाठीमागे जमा केला जातो. कचरा उठाव न झाल्याने दुर्गंधीमुळे डॉक्टरांसह वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, कर्मचारी, रुग्णांचा श्वास कोंडला आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळेच येथील कचरा उठाव होत नाही. त्यांना या कचर्‍या वावडे का, आहे असा प्रश्न रुग्णांसह नातेवाईकांमधून होत आहे.

स्वच्छतेचा ठेका खासगी कंपनीकडे

सीपीआरसह आवारातील स्वच्छतेचा ठेका खासगी कंपनीकडे आहे. त्या कंपनीचे जवळपास दीडशे कर्मचारी येथे साफसफाई करतात. जमा झालेला कचरा प्लास्टिक पिशव्या भरून एकत्र ठेवला जातो, तर झाडांचा पाला, कागदी कचरा एकत्र करून कचरा कंटेनरमध्ये टाकला जातो. गेल्या चार ते पाच दिवसांपासून कचर्‍याच्या पिशव्या प्रसूती आणि आणि बर्न विभागाच्या मागे पडून आहेत. भटक्या कुत्र्यांनी कचर्‍याच्या पिशव्या विस्कटल्याने कचरा बाहेर पडला आहे. यात कोंडाळाही कचर्‍याने भरून गेला आहे. पाऊस सुरू झाल्याने कचर्‍यातून दुर्गंधी सुटली आहे. डास आणि कीटकांचा प्रदुर्भाव वाढला आहे.

सीपीआरमध्ये पाचशेच्या वर बेड आहेत. चारशेच्या वर रुग्ण अ‍ॅडमिट असतात. त्यांचे नातेवाईक रुग्णालय आवारातील निवारा शेडमध्ये विश्रांसाठी असतात. कचर्‍यामुळे सुटलेली दुर्गंधी व डासांचा उपद्रव सोसवत नाही. रात्र काढणे सत्त्वपरीक्षा ठरत आहे. दररोज सीपीआर स्वच्छ केले जाते; मात्र महापालिकेचा कंटेनर कचरा उठावासाठी न आल्यानेच येथे मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे.

महत्त्वाचे विभाग अन् कचर्‍याचा विळखा

सीपीआरमधील कचरा जमा करण्यात येणार्‍या ठिकाणाला लागून बर्न, प्रसूती, बालरोग, हृदय शस्त्रक्रिया या विभागांसह मुलींचे वसतिगृह, कॅन्टीन आहे. पाऊस झाल्याने कचरा भिजला असून, प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. संसर्ग पसरण्यापूर्वी येथील कचरा उठाव करून औषध फवारणी करणे गरजेचे आहे.

SCROLL FOR NEXT