आजरा : पुढारी वृत्तसेवा आई-वडिलांसह मुलाला मारहाण करून बांधून घालून ३० लाख रूपयांचा जबरी दरोडा घातल्याची घटना आजरा तालुक्यातील खानापूर पैकी रायवाडा येथे आज बुधवारी घडली आहे. या घटनेत वडील व मुलगा जखमी झाले आहेत.
या विषयी घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, खानापूर येथील प्रल्हाद राजाराम गुरव यांचा रायवाड्यानजिक चिरका नावाच्या शेतावर वराह पालन व काजूचा व्यवसाय आहे. गुरव, त्यांची पत्नी पूनम व मुलगा राजेश हे व्यवसायाच्या ठिकाणीच राहण्यास आहेत. आज (बुधवार) पहाटे अडीज वाजण्याच्या सुमारास सुमारे तीस जणांच्या टोळक्याने गुरव राहण्यास असलेल्या काजू फॅक्टरीचा दरवाजा तोडला. दरोडेखोरांच्या हातांमध्ये टॉर्च, लाकडी दांडके, तलवार, लोखंडी रॉड होते. तसेच ते मराठी व कन्नड भाषेत बोलत होते. सर्वजण धिप्पाड व काळे कपडे घातलेले तसेच तोंडाला मास्क लावलेले होते. त्यांनी तीघांनाही मारहाण करीत दोरीच्या सह्याने खुर्ची व कॉटला बांधून घातले.
त्यानंतर वराह पालनातील सुमारे २२० डुक्करे, १५० किलो तयार काजूगर, सात तोळे सोने, १५ तोळे चांदी, रोख २५ हजार रूपये असा सुमारे ३० लाखांचा माल लंपास केला. या घटनेने खानापूरसह आजरा तालुक्यात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर कोल्हापूरहून श्वान पथक आले, पण ते काजू फॅक्टरीच्या परिसरातच घुटमळले. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.
हेही वाचा :